दोन आठवड्यांनी समोर येऊ शकतात गर्दीचे परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:07+5:302021-06-04T04:13:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत मास्कचा व्यवस्थित ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. या गर्दीत मास्कचा व्यवस्थित वापर न करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आगामी काळात रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या गर्दीचे परिणाम हे दहा ते चौदा दिवसांनंतर समोर येतील व तेव्हा नेमके चित्र स्पष्ट होईल, असे डाॅक्टरांचे म्हणणे आहे. मात्र, नागरिकांनी नियम न पाळल्यास धोका कायम राहणार असल्याचा इशाराही डॉक्टरांनी दिला आहे.
पहिल्या लाटेनंतरच्या शिथिलतेमुळे कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक झाल्याचेही काही तज्ज्ञांचे मत आहे. यात बाजारपेठांमधील गर्दी ही अनियंत्रित होती. शिवाय लग्न सोहळ्यांमध्ये उडालेली गर्दी व ग्रामपंचायतीच्या निवडणुका ही काही कारणे रुग्णसंख्या वाढीस समोर आली होती. शिवाय त्यातच विषाणूची तीव्रता वाढल्यानेही धोका वाढल्याचे सांगण्यात येत होते. आता रुग्णसंख्या घटण्यामागे विषाणूची तीव्रता कमी होणे हेही एक कारण असू शकते असे काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. गर्दीचे परिणाम आताच तातडीने समोर येणार नाहीत. यासाठी कालावधी लागेल मात्र, साधारण दोन आठवड्यानंतर या गर्दीचा नेमका काय परिणाम होतोय हे समोर येईल, सध्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. मात्र, गर्दीत सोशल डिस्टन्सिंग राहात नसल्याने संसर्ग पुन्हा वाढू शकतो, अशी भीती आहे.
संसर्गाचे दोन प्रकार
शहरात आता दहा ते तीस या दरम्यान बाधित आढळून येत आहे. त्यामुळे शहरात संसर्ग कमी असला तरी बाहेरील व्यक्तिंकडून तो वाढू शकतो, गर्दीत कोण कुठून आला आहे हे सांगणे कठीण असते, त्यामुळे स्थानिक संसर्ग व बाहेरून येणारा संसर्ग असे संसर्गाचे दोन प्रकार होतात, असेही काही डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे गर्दीतून आजार वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे नागरिकांनी नियम पाळणे गरजेचे असल्याचे मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी म्हटले आहे.
ही घ्या काळजी
- मास्कने व्यवस्थित नाक, तोंड झाका ते मानेवर किंवा केवळ तोंडावर लावू नका
- शक्यतोवर बाहेर पडणे टाळा, किंवा बाहेरून आल्यावर हात - पाय, चेहरा स्वच्छ धुवा
- गर्दीची ठिकाणे टाळावी, कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात धुतल्यानंतर नाका तोंडाला लावा.
कोट
गर्दीतून रुग्णसंख्या वाढण्याचा धोका अधिक आहे. साधारण दोन आठवड्यांनी याचे परिणाम समोर येतील. नागरिकांनी स्वत: काळजी घेणे यासाठी महत्त्वाचे आहे. मास्क हा नाका, तोंडावर व्यवस्थित वापरावा तो मानेवर लटकवू नये, घरी आल्यानंतर हात पायच नाही तर चेहराही स्वच्छ धुवावा, शक्यतोवर बाहेर फिरणे टाळावे. - डॉ. विजय गायकवाड, सहयोगी प्राध्यापक औषध वैद्यक शास्त्र विभाग