रासायनिक खतांच्या वापरामुळे कापसावर दुष्परिणाम, वडली येथे शेतकऱ्यांचे नुकसान
By सुनील पाटील | Published: July 16, 2023 06:04 PM2023-07-16T18:04:30+5:302023-07-16T18:04:44+5:30
शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला.
जळगाव : रासायनिक खताच्या वापरामुळे तालुक्यातील वडली शिवारात कापूस पिकावर दुष्परिणाम जाणवू लागला आहे. पिकाची वाढ खुंटली असून पानांना गळती तसेच आकुंचित पावत आहे. या प्रकारानंतर कृषी विभागाने शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. खते पुरविणाऱ्या दुकानदाराकडील साठा सील केला आहे. खतांचे नमुने घेण्यात आले असून विश्लेषणासाठी नाशिक प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनी गावातीलच कृषी केंद्रातून रासायनिक खत खरेदी केले होते. पिकांना दिल्यानंतर त्याचा लागलीच दुष्परिणाम जाणवू लागला. संजय बापू पाटील, किरण बापू पाटील, अवधूत माणिक पाटील, संतोष नामदेव कुंभार व साहेबराव ओंकार पाटील या शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वाढ खुंटली, पाने पिवळी पडण्यासह ते आकुंचित पावले. खतांमुळेच हा प्रकार झाल्याचे लक्षात आले. जळगाव बाजार समितीचे संचालक अरुण लक्ष्मण पाटील यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी तालुका कृषि अधिकारी शिवाजी राऊत, पंचायत समितीचे कृषि अधिकारी धीरज बढे, मंडळ कृषि अधिकारी मिलिंद वाल्हे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक नरेंद्र पाटील यांनी पाहणी शेतात जाऊन पिकांची पाहणी केली व पंचनामे केले.
खत पिकापासून लांब केले
गावातील कृषी केंद्रावरुन १५ टन खत विक्री झाले आहे. ते २६ शेतकऱ्यांनी घेतले आहे. या शेतकऱ्यांची यादी कृषी अधिकाऱ्यांनी घेतली. सहा शेतकऱ्यांच्या पिकावर दुष्परिणाम जाणवताच ज्या शेतकऱ्यांनी नुकताच खताचा मात्र दिला, त्यांनी लागलीच पिकापासून खत वेगळे करण्याचे काम हाती घेतले होते.
गिरीश महाजनांच्या सूचना
जामनेर, बोदवड व जळगाव तालुक्यात कापूस पिकात रासायनिक खत टाकल्यानंतर कापूस पिकावर दुष्परिणाम दिसून आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना सूचना देऊन संबंधित शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करण्यास सुचीत केले असून शेतकऱ्यांनी वापरलेल्या रासायनिक खतांचे नमुने तपासणी करता पाठवण्याच्या सूचना दिल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
सहा शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंचनामे केले आहेत. खतांचा साठा सील करण्यात आला आहे. नमुने नाशिक प्रयोग शाळेत पाठविले आहेत. १५ दिवसात अहवाल येईल. नियमानुसार जी नुकसान भरपाई देणे शक्य आहे, ती देण्यात येईल.
-धीरज बढे, कृषी अधिकारी