मंदिर सामाजिक जनजागृतीचे अधिष्ठान बनण्यासाठी प्रयत्न- पिंपरीकर गुरुजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 12:30 AM2020-07-19T00:30:59+5:302020-07-19T00:32:30+5:30

अध्यात्माच्या माध्यमातून व्यसनाधिनतेविरुद्ध जनजागृती व सामाजिक चळवळ गायत्री परिवार माध्यमातून उभी केली असल्याचे लक्ष्मण उखर्डू पिंपरीकर गुरुजी यांनी सांगितले.

Efforts to make the temple the abode of social awareness - Pimprikar Guruji | मंदिर सामाजिक जनजागृतीचे अधिष्ठान बनण्यासाठी प्रयत्न- पिंपरीकर गुरुजी

मंदिर सामाजिक जनजागृतीचे अधिष्ठान बनण्यासाठी प्रयत्न- पिंपरीकर गुरुजी

googlenewsNext
ठळक मुद्देलक्ष्मण उखर्डू पिंपरीकर गुरुजी यांची मुलाखत संडे स्पेशल मुलाखत

विनायक वाडेकर।
मुक्ताईनगर, जि.जळगाव : मंदिर केवळ पूजेचे स्थान नव्हे तर सामाजिक जनजागृतीचे अधिष्ठान बनण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तसेच विघातकतेकडे चाललेली घोडदौड थांबवून हा प्रवाह विधायकतेकडे वळविण्यासाठी गायत्री परिवाराचे जे ध्येय आहे त्यात एक कार्यकर्ता म्हणून आपण काम केले. अध्यात्माच्या माध्यमातून व्यसनाधिनतेविरुद्ध जनजागृती व सामाजिक चळवळ गायत्री परिवार माध्यमातून उभी केली असल्याचे लक्ष्मण उखर्डू पिंपरीकर गुरुजी यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
प्रश्न : समाज व्यसनमुक्त असावा याची प्रेरणा कशी मिळाली?
माझे बालपण अतिशय सर्वसामान्य परिस्थितीत पिंपरी, ता.नांदुरा या गावी गेले. तत्कालिन व्यावसायिक, शैक्षणिक प्रशिक्षण मी घेतले होते. समाजात दारूचे अनिष्ठ व्यसन खूप होते. नोकरी लागण्याआधी केवळ दारूच्या व्यसनामुळे महिलांना होणारी मारझोड व अनेक स्त्रियांचे उद्ध्वस्त होणारे संसार मी पाहिलेले होते. त्यामुळे मूळातच मला व्यसनाचा तिरस्कार हा होता. व्यसनमुक्तीसाठी काहीतरी करावे हे माझे मानस बालपणापासूनच होते. १९६२ला मला परभणी जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळाली.
१९६३ ला एकदा नांदेडला मी गेलेलो असताना गोदावरी काठी एका साधूकडून मला समजले की ‘व्यसनमुक्तीसाठी त्या व्यक्तीचे मनोबल वाढवणे आवश्यक आहे, मानसिक मनोबल वाढवण्यासाठी धार्मिक अधिष्ठान असणे आवश्यक आहे.’ हे मला १९६४ ला गायत्री परिवाराचे संस्थापक गुरुदेव श्रीराम शर्मा आचार्य यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर समजले. तेव्हापासून जवळपास दोन हजार व्यसनाधीन युवकांना व्यसनमुक्त करण्याचे शुभ कार्य माझ्या हातून घडलेले आहे.
तत्कालिन महाराष्ट्र राज्याच्या दारुबंदी मंत्री प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते १९७६ मध्ये माझा गौरवदेखील त्यासाठी करण्यात आला होता.
प्रश्न : मुक्ताईनगर येथे गायत्री मंदिर स्थापन करण्याची प्रेरणा कशी मिळाली?
बालपणापासूनच अध्यात्माची आवड होती. त्यातच १९६४ ला दीक्षा घेतल्यानंतर मी हरिद्वार येथे १९७१ मध्ये गायत्री मंत्राची साधना केली. पौरोहित्याचे शिक्षणही दोन महिने मथुरा येथे घेतले. त्या काळात मी गायत्री परिवाराच्या ‘अखंड ज्योती’ या मासिकाचे पहिले मराठी अनुवादक म्हणूनही काम केले. १९७५ मध्ये मुक्ताईनगर तालुक्यात शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली. घराच्या जवळ आल्याचा भास झाल्याने व्यसनमुक्तीसाठी गायत्री यज्ञाचे अधिष्ठान सुरू केले. धार्मिक अधिष्ठान यामुळे खूप मोठे यश मिळते ही बाब माझ्या लक्षात येताच मुक्ताईनगर येथे गायत्री मंदिर असावे यासाठी प्रयत्न सुरू केले. २००८ मध्ये दत्तात्रय सीताराम पाटील यांच्या सहकार्याने गायत्री मंदिराची स्थापना केली. या गायत्री मातेच्या दरबारात सर्वच राष्ट्रीय उपक्रम, सामाजिक कार्यक्रम, १६ संस्कारपूर्ण जीवन असे नियमित उपक्रम होतात. मंदिर केवळ पूजेचे स्थान नव्हे तर सामाजिक जागृतीचे स्थान बनवण्यासाठी प्रयत्न केले.
प्रश्न : आपल्या सामाजिक कार्याबद्दलही काय सांगाल?
माझ्या कोळी समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा यांच्याविरुद्ध जनजागृती करतानाच समाजातील उपवर मुलामुलींचे विवाह जुळवून आणणे. तसेच विनाहुंड्याने तसेच कमी खर्चात आदर्श विवाह करणे. यासारख्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेत भुसावळ येथील ज्ञानेश्वर धोंडू सोनवणे व अभिमन्यू सोनवणे यांच्या सहकार्याने कोळी समाज वधू-वर परिचय मंडळाची स्थापना केली. समाजातील मृतक भोजन बंद करण्यासाठी जागृती करणे. तसेच देवाजवळील बळी प्रथा बंद करण्यासाठी जनजागृती करणे यासारखे सामाजिक उपक्रम केले आहेत.
प्रश्न : ग्रंथालय स्थापन करण्यामागील उद्देश काय?
ग्रंथ हेच गुरू आहेत या जाणिवेतून जानेवारी २०१९ मध्ये मुक्ताईनगर येथे गायत्री परिवाराच्या नावानेच ग्रंथालयाची स्थापना केली. लहान मुलांवर टीव्हीतील आणि भ्रमणध्वनीवरील इंटरनेटद्वारे होणाºया अनिष्ट संस्कारांमुळे तरुणाई बिघडू नये यासाठी वाचन सर्वात महत्त्वपूर्ण आहे. आमच्या वाचनालयात नैतिक व मूल्य शिक्षण देणारे संस्कार करणारे विविध ग्रंथ आहेत. युवकांनी व बालकांनी ते वाचल्यास त्यांच्या जीवनात बदल घडल्याशिवाय राहणार नाही. विघातकतेकडे चाललेली घोडदौड थांबवून हा प्रवाह विधायकतेकडे वळवणे हे गायत्री परिवाराचे ध्येयच आहे आणि त्यात मी एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत असल्याने वाचनालयाची स्थापना केली.
 

Web Title: Efforts to make the temple the abode of social awareness - Pimprikar Guruji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.