बोदवड स्टेट बँकेतून साडेआठ लाखांची रोकड लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 05:54 PM2020-09-17T17:54:53+5:302020-09-17T17:55:12+5:30
स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाजवळून आठ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली.
बोदवड : शहरातील स्टेट बँकेत भरणा करण्यासाठी आलेल्या इसमाजवळून आठ लाख ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १७ रोजी सकाळी ११ वाजून ४७ मिनिटांनी घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील अमर डेअरीच्या मालकीची रक्कम भरणा करण्यासाठी डेअरीचा वाहनचालक असलेला कर्मचारी उमेश रमेश महाजन हा नऊ लाख रुपये घेऊन स्टेट बँकेत आला. एका बॅगेत ६० हजार रुपये रक्कम मोजून देत असताना दुसरी बॅग ज्यात आठ लाख ४० हजार रुपये रोख होते. ती जवळच्या टेबलावर ठेवली. तेव्हा काही कळायच्या आत मागून आलेल्या अज्ञात इसमाने आठ लाख ४० हजार रुपये रोख असलेली बॅग अलगद उचलून नेली हा प्रकार अगदी एका मिनिटात घडला. त्यानंतर पैशांच्या बॅगचा शोधाशोध केली असता चोरटा पसार झालेला होता.
ही बॅग चोरत असताना निळ्या रंगाचा शर्ट घातलेला २० ते २२ वर्षांचा तरुण बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याला या कामी मदत करणारा पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला तरुणही दिसतो.
याबाबतची फिर्याद उमेश महाजन याने बोदवड पोलिसात दिली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी आॅक्टोबर महिन्यात याच बँकेत अशाच प्रकारे जिल्हा परिषद सदस्य अनिल खंडेलवाल यांची पेट्रोलपंपाची ७० हजार रुपये रक्कम चोरट्यांनी लांबविली होती. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी बँकांना सुरक्षा रक्षक नेमण्याचे तसेच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याचे सूचविले होते. परंतु आधीच्या घटनेतून बोध न घेतल्याचे आजच्या घटनेतून दिसून येते, असा आरोप जनसामान्यांतून होत आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी पाहणी करत काही पुरावे घेतले असून तपास सुरू केला आहे, तर बँकांनी सुरक्षा रक्षक नेमावे तसेच सीसीस्टीव्हीदेखील सुरू ठेवावे असे सांगितले.