पाटणादेवी जंगलात आठ बिबटे; मोर, कोल्हे, काळवीट यांचेही दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2018 01:14 PM2018-05-02T13:14:14+5:302018-05-02T13:14:14+5:30
प्राणी गणना पूर्ण
आॅनलाइन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. २ - पाटणादेवी जंगल परिसरात ३० रोजी झालेल्या प्राणी गणनेत आठ बिबट्यांचे दर्शन झाले असून जंगलाच्या वेगवेगळ्या भागात त्यांचा अधिवास आहे. एकूण ६५५३ हेक्टर जंगल परिसरात १० निरीक्षण मनोरे उभारुन सलग २६ तास प्राणी गणना करण्यात आली. १५ कर्मचारी व काही वन्यजीव प्रेमी यात सहभागी झाले होते.
बौद्ध पौर्णिमेला पहाटेपासूनच प्राणी गणनेला सुरुवात झाली. यासाठी नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्यांजवळ निरीक्षण मनोरे, मचाणही बांधण्यात आले होते. गणना सोमवार ते मंगळवारी सकाळी १० पर्यंत म्हणजेच सलग २६ तास करण्यात आली.
बिबट्यांच्या परिवाराचे दर्शन
प्राणी गणनेत पाच मोठे तर तीन बछडे अशा आठ बिबट्यांच्या परिवाराचे दर्शन झाले.
पाटणादेवी निसर्ग केंद्राच्या मागे, गोमुखाकडे जाणा-या मारोती मंदिर परिसर आणि जुनोने जंगल परिसराच्या ३०९ झोन मध्ये बिबटे आढळून आले.
वैविध्यपूर्ण जैवविविधता
प्राणी गणनेत तडस- ११, भेकर- १०७, रानडुकरे- ९२६, काळवीट-३२, कोल्हे- १८, लांडगे-१३, नीलगायी- २१, चिंकरा- ५, सायाळ- ८, ससे- ५६, मोर- २७१, माकडे- ५२६ यासह दूर्मिळ पक्षी, अशा वन्यजीवांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.
गेल्या काही वर्षात पाटणादेवी जंगल परिसरात चराईबंधीसह कु-हाडबंदी, शिकारबंदी यांची प्रभावी अंमलबजावणी केल्याने प्राण्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे निरीक्षण वनविभागाने नोंदविले आहे.
जंगलात अन्नसाखळी, सुरक्षित अधिवास, पाणवठ्यांची निर्मिती असे उपक्रम वनविभाग राबवित आहे. यामुळे प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेत देखील वाढ झाली आहे. ऊन्हाचा दाह लक्षात घेऊन कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे.
सलग २६ तासाच्या गणनेत विविध प्राण्यांच्या नोंदी करण्यात आल्या. गेल्या वर्षाच्या तुलनेत प्राण्यांच्या संख्येत वाढही झाली आहे. प्राणी गणनेचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्यात येणार आहे. पर्यटकांनी प्राण्यांना त्रास होईल असे वर्तन टाळावे.
- एम. बी. पटर्वधन, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, चाळीसगाव.