मुक्ताईनगर येथे ट्रॅक्टर ट्रॉली उलटून आठ विद्यार्थी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 04:50 PM2018-09-17T16:50:35+5:302018-09-17T16:51:33+5:30
श्री विसर्जन आटोपल्यानंतर महाविद्यालयातील घटना
मुक्ताईनगर, जि.जळगाव : येथील जी.जी.खडसे महाविद्यालयातील पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करून परतलेले ट्रॅक्टर महाविद्यालयाच्या आवारात उलटून त्यात आठ विद्यार्थी जखमी झाले. ही घटना सोमवारी दुपारी दोनला घडली. यातील तिघा जखमींना जळगावला हलविण्यात आले आहे.
जखमींमध्ये लोकेश पुंजाजी महाजन, आदेश ओमप्रकाश नेमाडे, नीरज अवतारे, आदर्श बिराडे, चेतन युवराज चिमकर, निकेश सुनील कोथळकर, हर्ष कोळी, स्वप्नील नारखेडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी नीरज अवतारे, लोकेश महाजन व स्वप्नील नारखेडे यांना जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे.
खडसे महाविद्यालयात दरवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही विद्यार्थ्यांनी श्रींची स्थापना केली होती. पाच दिवसांचा गणपती येथे साजरा होतो. परंपरेप्रमाणे पाचव्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणूक महाविद्यालयात उत्साहात पार पडली. मिरवणुकीनंतर ट्रॅक्टरद्वारे पूर्णा नदी खामखेडा पुलावर श्रींचे विसर्जन आटोपून परतणारे विद्यार्थी महाविद्यालयाच्या पटांगणात परतले. येथे भरधाव ट्रॅक्टर वळवताना ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली आणि हा अपघात झाला. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने डॉ.एन.जी.मराठे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर काहींना उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.