सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोघांना आठ वर्ष सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 04:38 PM2019-12-31T16:38:52+5:302019-12-31T16:39:01+5:30
उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणात रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना न्यायालयाने सोमवारी आठ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
जळगाव : कपडे धुण्याच्या कारणावरून अनिल सखाराम मोरे (रा.नागदुली, ता.एरंडोल) यांना झालेली मारहाण व त्यानंतर उपचारादरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणात रशीद कबीर शेख व रफिक उर्फ इकबाल रशीद शेख या दोघांना न्यायालयाने सोमवारी आठ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागदुली येथे १९ ऑगस्ट २०१७ रोजी अनिल मोरे यांची मुलगी मुतारीजवळ धुणे धुत असताना रशीद व रफिक या दोघांनी मोरे यांच्या मुलीस धुणं धुण्यास मनाई केली. त्यावर मोरे यांनी गावातील सर्व महिला येथे धुणे धुतात मग, माझ्याच मुलीला विरोध का असे म्हटले असता दोघांनी अनिल मोरे यांना लाकडी दांडा व लाथाबुक्यांनी डोक्याला, पोटावर व पायावर जबर मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तेथे पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदविला होता. त्यानंतर उपचारादरम्यान मोरे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघं आरोपींविरुद्ध एरंडोल पोलीस स्टेशनला खून व ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता.
प्रत्यक्षदर्शीची साक्ष व मृत्यूपूर्व जबाब ठरला महत्वपूर्ण
तपासाधिका-यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जे. कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली मोरे यांची मुलगी व तपासाधिका-यांनी घेतलेला मृत्यूपूर्व जबाब महत्वपूर्ण ठरला. यात १५ जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. पुरावा, सरकारी वकील चारुलता राजेंद्र बोरसे यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दोघांना कलम ३०४ भाग २ व ३२३ सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी धरून ८ वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अॅड.चारुलता बोरे यांनी कामकाज पाहिले. केसवॉज बैसाने व पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार शालीग्राम पाटील यांनी मोलाची मदत केली.