एकनाथ खडसे पुन्हा चढले कोर्टाची पायरी! आता 'या' भाजप आमदाराच्या विरोधात खडसे कोर्टात...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 03:22 PM2023-07-15T15:22:21+5:302023-07-15T15:25:38+5:30
एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली.
प्रशांत भदाणे
जिल्ह्यातील चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अब्रू नुकसानीचा फौजदारी खटला दाखल केलाय. या खटल्याची शनिवारी पहिली सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने खडसे यांचा जबाब नोंदवून घेतलाय.
शनिवारी एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. न्यायालयाने खडसेंचं म्हणणं ऐकून घेतलं असून, या खटल्याची आता पुढची सुनावणी सुरू होणार आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
राजकीय टीकाटिप्पणी करताना आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंवर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यानंतर खडसेंनी अब्रू नुकसान केली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. मात्र, त्या नोटिसीला त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे खडसेंनी आता हा फौजदारी खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या कामासाठी खडसे शनिवारी न्यायालयात हजर झाले होते. भादंवि कलम 500 आणि 66 अ अंतर्गत मंगेश चव्हाण यांना अब्रू नुकसान केल्याप्रकरणी शिक्षा व्हावी तसंच 51 हजार रुपयांचा प्रतिकात्मक स्वरूपात दंडही करावा, अशी मागणी खडसेंनी न्यायालयाकडे केलीये.