Eknath Khadse: “जळगावमधून भाजप भुईसपाट होत चाललीय”; नाथाभाऊंचा गिरीश महाजनांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 12:34 PM2022-02-20T12:34:15+5:302022-02-20T12:38:02+5:30
Eknath Khadse: आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे.
जळगाव: भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) सातत्याने भाजपवर टीका करत असतात. एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजप आणि भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर निशाणा साधला आहे. आगामी जळगाव जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी घेतलेल्या एक बैठकीमुळे एकनाथ खडसे यांचा तिळपापड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जळगावमधून भाजप भुईसपाट होत चालली असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली आहे.
आगामी जळगाव जिल्ह्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आतापासून तयारी सुरू केली आहे. भाजप नेते गिरीश महाजनांनी बैठकीचे सत्र सुरू केले आहे. आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. निवडणुका कधीही जाहीर होऊ द्या. मात्र, कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, अशा सूचना भाजपकडून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
पंचायत समिती निवडणुकीची झलक
भाजपने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली. भाजपची नगरपालिका, नगपंचायत निवडणुकीवर ताकद दिसून आली. जळगावमध्ये भाजप भुईसपाट होत चालली आहे. ही आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची झलक आहे, अशा इशारा खडसे यांनी दिला. ते टीव्ही९शी बोलत होते. दुसरीकडे, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यातही सतत कलगीतुरा रंगत आहे.
दरम्यान, राज्यातील महत्त्वाची महापालिका म्हणून नाशिककडे पाहिले जात आहे. या महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कोणाकडे असणार याची चर्चा आता सुरू झाली असून, देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागल्याचे म्हटले जात आहे.