Eknath Khadse: "अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आल्या आहेत, छोटा शकील अन् दाऊद..."; धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 01:57 PM2024-04-17T13:57:57+5:302024-04-17T13:59:50+5:30
Eknath Khadse reaction on death threat: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे चार-पाच फोन आले. त्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Eknath Khadse reaction on death threat: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. याचदरम्यान, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात असलेले आणि लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगलेले एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी त्यांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे. त्यानंतर जळगावमध्ये असताना त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
"दोन दिवसांपासून मला विदेशासह परराज्यातून धमकीचे कॉल आले आहेत. दाऊद व छोटा शकीलच्या नावांचा उल्लेख करत 'आपको मारना है' अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात येत आहेत. सुरुवातीला मला वाटले की कोणीतरी खोडसाळपणा करत असेल पण सातत्याने फोन आल्याने मी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेचा राजकीय संबंध असेल असे मला वाटत नाही, मात्र पोलीस चौकशी करत आहेत. त्यामुळे तथ्य बाहेर येईल. अशा धमक्या मला अनेक वेळा आल्या आहेत. त्यामुळे परिवारात कुठेही भीतीचे वातावरण नाही. खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांना सुचित केले आहे आणि आम्हीही आवश्यक ती काळजी घेत आहोत," अशी प्रतिक्रिया जीवे मारण्याची धमकीचे कॉल आल्याप्रकरणी एकनाथ खडसेंनी दिली.
"राजकीय नेत्यांना नाउमेद करण्यासाठी अशा प्रकारचे प्रकार केले जातात, मात्र सातत्याने धमकीचे कॉल आल्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. या घटनेच्या मागे कुठलंही राजकीय कनेक्शन असेल असा माझा अंदाज नाही. आधी एकदा, मनोज भंगाळे नामक व्यक्तीने माझ्यावर आक्षेप घेतला होता की माझा दाऊदच्या पत्नीशी सातत्याने संभाषण होत असते. पण आता या धमकीचा काही राजकीय संबंध असेल असे मला वाटत नाही. कुठल्याही धमक्यांना आम्ही भीत नाही. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी आणि माझे कुटुंब आवश्यक ती काळजी घेत आहोत. छोटा शकील आणि दाऊद या अशा फालतू कामामध्ये पडत नाहीत," असेही ते रोखठोकपणे म्हणाले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ खडसे यांना आतापर्यंत धमकीचे चार ते पाच फोन आले आहेत. वेगवेगळ्या नंबरवरुन एकनाथ खडसे यांना हे धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे जळगावच्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.