खडसे वैफल्यग्रस्त झालेत, नाथाभाऊंच्या टिकेवर महाजनांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 09:21 PM2022-01-09T21:21:35+5:302022-01-09T21:21:55+5:30
जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून काहींनी माघार घेतली. ती केवळ पराभवाच्या भीतीपोटी, असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांना लगावला आहे.
मुक्ताईनगर जि. जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून काहींनी माघार घेतली. ती केवळ पराभवाच्या भीतीपोटी, असा टोला माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आमदार गिरीश महाजन यांना लगावला आहे. तर खडसे हे वैफल्यग्रस्त झाल्याने ते आता काहीही बोलायला लागले आहेत, असा प्रतिटोला महाजन यांनी खडसे यांना मारला आहे.
अंतुर्ली ता. मुक्ताईनगर येथे दादासाहेब रामभाऊ तराळ दूध उत्पादक सोसायटीच्यावतीने रविवारी कार्यक्रम झाला. यात जिल्हा बॅंकेतील नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खडसे बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते विनोद तराळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
गिरीश महाजन यांना शनिवारी कोरोनाची बाधा झाली. यानंतर महाजन व खडसे यांच्यात कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटवरुन जोरदार शाब्दीक वाद रंगला होता. महाजन- खडसे यांच्यातील असाच शाब्दीक वाद बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारातील शेवटच्या दिवशीही रंगला होता. रविवारी पुन्हा या वादात आणखी भर पडली ती खडसे यांच्या वक्तव्याने. जिल्हा बॅंक निवडणुकीतून भाजपने माघार घेतली होती. यावर खडसे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. त्यामुळे आणखी नव्या वादाला तोंड फुटल्याचे मानले जात आहे.
"खडसे यांचे म्हणणे गंभीर घ्यावे असे आता वाटत नाही. वैफल्यग्रस्त झाल्याने ते आता काहीही बोलायला लागले आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे"
- गिरीश महाजन, आमदार, जामनेर.