एकनाथ खडसेंचे आंदोलन तूर्त स्थगित; आता न्यायालयात मागणार दाद
By सागर दुबे | Published: October 14, 2022 01:56 PM2022-10-14T13:56:03+5:302022-10-14T13:56:10+5:30
जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरण; एकनाथ खडसे पोलीस ठाण्याबाहेर पलंग टाकून झोपले!
सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघातील लोणी, दूधाची भुकटी चोरी प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांनी गुरूवारी दुपारपासून शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी पोलीस ठाण्याच्या बाहेरच ठिय्या आंदोलन करत ते तिथेच रात्रभर झोपले. मात्र, शुक्रवारी सकाळी पुन्हा पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा होऊन सुध्दा गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे पोलिसांवर कुणाचा तरी दबाव असून ते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करित आता आपण न्यायालयात दाद मागणार असून ठिय्या आंदोलनात तूर्त स्थगित देत असल्याची घोषणा खडसे यांनी केली.
जळगाव जिल्हा सरकारी दूध संघातील १४ टन लोणी आणि नऊ टन दूधाची भुकटी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरूवारपासून दुपारी शहर पोलीस ठाणे गाठले होते. त्यावेळी पोलिसांनी चौकशी करूनच गुन्हा दाखल करू, असे सांगितल्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाणे सोडणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली होती. नंतर पोलीस ठाण्यातच त्यांनी जेवण केले. रात्री ९ वाजता पोलीस ठाण्याच्या बाहेर मंडप उभारून त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले.
पोलीस ठाण्याबाहेर मुक्काम...
पोलिसांना वारंवार गुन्हा दाखल करण्याची विनंती करून सुध्दा गुन्हा दाखल न झाल्याने आमदार खडसे यांनी आक्रमक होत पोलीस ठाण्याबाहेर मुक्काम ठोकला. रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन ठिकाणी पलंग टाकून ते तेथेच झोपले.
पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा...
पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी शुक्रवारी सकाळी ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी खडसे यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्हा दूध संघातील चोरी प्रकरणी चर्चा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात शहर पोलीस ठाणे आवारात गर्दी झाली होती. तर पोलिसांचा सुध्दा तगडा बंदोबस्त होता. मात्र, चर्चेअंती सुध्दा कुठला तोडगा निघाला नाही.
काय म्हणाले खडसे...काय आहेत आरोप...
जिल्हा दूध संघात दीड कोटी रूपयांच्या मालाची चोरी होते. तरी पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली जाते ही गंभीर बाब आहे. पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा झाली. ते कुणाच्या तरी दबावाखाली असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चोरीचा गुन्हा दाखल करावा, ही विनंती वारंवार करून सुध्दा चौकशी करू, मगच गुन्हा दाखल करू असे सांगण्यात आले. आरोपींना प्रत्यक्ष मदत करण्याची पोलिसांची भूमिका दिसते. आता आम्ही ठरविले आहे. आता न्यायालयामध्ये १५६-३ खाली दाद मागणार असून न्यायालयात संपूर्ण भुमिका मांडणार आहे. त्यामुळे आंदोलनाला तूर्त स्थगित दिली आहे.
निष्पक्ष आणि योग्य ती कायदेशीर कारवाई होईल...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातल्या अपहार आणि चोरी प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तक्रारींच्या अनुषंघाने पोलिसांकडून शहानिशा करणे सुरू आहे. - डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"