‘एकनाथ खडसेंनी चौकात येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी,’ आमदार मंगेश चव्हाण यांचे खडसेंना आव्हान
By आकाश नेवे | Published: October 15, 2022 06:44 PM2022-10-15T18:44:13+5:302022-10-15T18:44:37+5:30
जिल्हा दूध संघातील घटना व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
जळगाव : दूध संघातील भुकटी आणि बटर यांच्या अपहाराच्या प्रकरणाबाबत तसेच इतरही बाबींवर आमदार एकनाथ खडसे यांनी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेत, ते सांगतील त्या तारखेला आणि वेळेवर आपण तेथे त्यांच्याशी त्याबाबत चर्चा करू, त्यांना प्रश्न विचारु, त्यावर त्यांनी समाधानकारक उत्तरे द्यावी, अन्यथा राजीनामा द्यावा, असे आवाहन भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे.
जिल्हा दूध संघातील घटना व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. चव्हाण म्हणाले की, अपहाराची तक्रार दिल्यानंतर त्यात पोलीस प्राथमिक चौकशी करून गुन्हा दाखल करतात. तसे आश्वासन त्यांनी दिले आहे. त्यात खडसे परिवाराने नंतर खोटी बिले तयार केली. आणि बळी देण्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नावेही तयार केली आहेत. हा साधारणतः १ कोटी १५ लाखांचा अपहार आहे. यात शिल्लक मालाची जबाबदारी ही कार्यकारी संचालकांची आहे. यात वाईच्या कोल्ड स्टोअरेज मधील स्टॉक शोधण्यात आला. तिथेही स्टॉक नसल्याचे समोर येत आहे. दूध संघाकडे स्वत:चे शीतकरण यंत्र आहे. तरीही दुसरीकडे कोल्ड स्टोरेजला माल का पाठवण्यात आला. या कोल्ड स्टोअरेजचे भाडे आणि वाहतुकीवरही संघाने ७ कोटींचा खर्च केला आहे. ए ग्रेड तुप हे बी ग्रेड करून विकले जाते. त्याचीची चौकशी करण्यात यावी.’
चव्हाण पुढे म्हणाले की, एनडीडीबीने जेव्हा दूध संघ संचालकांच्या ताब्यात दिला होता. तेव्हा तो फायद्यात होता. खडसे यांनी आयत्या पीठावर रेघोट्या ओढल्या. आणि नंतर खडसेंनी दूध संघ कसा बुडवला हे सिद्ध करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले.दूध संघात सिंडिकेट असून त्यात खडसे परिवार सहभागी असल्याचा आरोपही त्यांंनी केला. यात पीए म्हणून काम करत असलेला मयूर खेवलकर हा पैसे गोळा करण्याचे काम करत होता. त्याची चौकशी करण्यात यावी. यात गुन्हा एमडींवरच दाखल होणार आहे. त्यामुळे खडसे यांनी आंदोलनाचे नाटक केल्याचेही ते म्हणाले.
‘ सावलीला ही उभा राहणार नाही ’
खडसे यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय पॅनल करण्याचे बोलून दाखवले होते. त्यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, पुढे निवडणूक आहे. त्यात आपण खडसे परिवाराच्या सावलीला ही उभे राहणार नाही. त्यांनी संचालक मंडळाला फक्त सहीपुरतेच ठेवले होते.’