Eknath Khadse: समजा विरोधकांनी हे सरकार पाडलंच, तरी...; एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 09:18 AM2022-02-14T09:18:55+5:302022-02-14T09:20:04+5:30
चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
जळगाव/भुसावळ - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे विधान करतात. मात्र, २ वर्षांपासून हे सरकार स्थीर असल्याचे दिसून येते. नुकतेच, १० मार्च रोजी देशातील पाच राज्यांच्या निवडणुक निकाल येणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीबाबत भविष्यवाणी केली होती. त्यावरुन, राष्ट्रवादीचे नेते चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर देत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता एकनाथ खडसेंनीही पाटील यांच्यावर प्रहार केला आहे.
भुसावळ येथे अनिकेत पाटील मित्रमंडळ व अफ्फन क्रिकेट क्लबतर्फे आयोजीत स्व. निखीलभाऊ खडसे स्मृती चषक-२०२२ या स्पर्धेच्या पारितोषीक वितरणाच्या कार्यक्रमात आल्यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला. या कार्यक्रमासाठी सिनेअभिनेत्री श्रावणी गोस्वामी, खासदार रक्षा खडसे राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे, आधी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १० माचर्नंतर जाणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. या मुद्द्यामवर माध्यमांनी उपमुख्यमंत्री पवार यांनी छेडले असता. त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला. तर, एकनाथ खडसेंनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार असून महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी अनेकवेळी त्यांनी तारखा जाहीर केल्या. मात्र, चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले असून सत्तेत नसल्याने त्यांना वन वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच, अशा प्रकारचे वक्तव्य ते करतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
बहुमताच्या जोरावर हेच सरकार येणार
बहुमतापेक्षाही कितीतरी अधिक आमदार महाविकास आघाडीकडे आहे. सरकार पाडायचा विचार केला व दुर्दैवाने सरकार पाडलं तरी बहुमताच्या जोरावर परत हेच सरकार येणार आहे. सरकार पाडायला ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात असून जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोपर्यंत हे सरकार कुणीही पाडू शकत नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.
अण्णा हजारेंचा विरोध
वाईनबाबत एक विरोध करतोय तर दुसरे स्वागत करत आहेत. वाईन ही दारू असल्यानेच अण्णा हजारेंनी विरोध केला आहे. मध्यप्रदेशात मॉलमध्ये बिअर विकायला भाजप सरकारने परवानगी दिली. आंध्र प्रदेशमध्ये भाजपला निवडून दिलं तर दारुही गरिबांच्या हिताची असल्याने पन्नास रुपयांमध्ये दारू देऊ असे वक्तव्य येथील प्रदेशाध्यक्षांनी केले आहे. त्यामुळे वाईनबाबत भाजपची दुटप्पी भूमिका का? असा सवालही एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे.
बच्चू कडूंच्या राजीनाम्याबाबतही बोलले
मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी भाजपकडून केली जात आहे. याबाबत प्रतिक्रिया देत एकनाथ खडसे यांनी बच्चू कडू हे वरच्या न्यायालयात दाद मागणार असून वरच्या न्यायालयात काय निर्णय लागतो याची वाट पाहिली पाहिजे, असे म्हणत खडसेंनी कडूंची पाठराखण केली.