Eknath Khadse: "डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 08:01 PM2022-07-22T20:01:42+5:302022-07-22T20:17:01+5:30
Eknath Khadse: राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे.
जळगांव - राज्यात गेल्या महिनाभरापासून घडत असलेल्या नाट्यमय घडामोडींदरम्यान शिवसेनेतील फूट आणि नव्या सरकारच्या वैधतेबाबतचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. त्यानंतर, आता कोर्टाने दोन्ही गटांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत देत पुढच्या सुनावणीसाठी १ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होणार की, पुढच्या तारखेपर्यंत लांबणार असा प्रश्न विचारला जात आहे. तर, सरकारकडून विस्ताराला तारीख पे तारीख मिळत आहे. त्यावरुन, आमदार एकनाथ खडसे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्यातील एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विस्तार दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच भाजप व शिंदे गटाच्या आमदारांच्या बैठकीत ही माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल आणि तो दोन टप्प्यात असेल, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी होणारा विस्तार हा लहान असेल आणि मोठा विस्तार हा अधिवेशनानंतर केला जाईल. मात्र, या विस्ताराची तारीख अद्यापही ठरत नाही. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह आदित्य ठाकरे यांनीही हे सरकारच घटनाबाह्य असल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही, असे म्हटले आहे. आता, माजीमंत्रीएकनाथ खडसे यांनीही मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार, असा सवाल विचारला आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पाळणा हलला. मात्र, अद्यापही इतर मंत्र्यांचा पाळणा हललेला नाही. डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, असे म्हणत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. अनेक बंडखोर मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. पण, आता सेना भवनातून काहीही ठरत नाही, दिल्लीला जाऊन परवानगी आणावी लागते, असा टोलाही खडसेंनी लगावला. तसेच, राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार लवकरात लवकर करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची घोषणा लवकरात लवकर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
महिनाअखेरीस होणार विस्तार
मंत्रिमंडळ विस्तार 26 किंवा 27 जुलैला होण्याची शक्यता आहे. कारण, 23 जुलै राज्यात भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर, 24 जुलै रोजी राज्यभर आदिवासी पाड्यावर जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी महिला विराजमान झाल्याने भाजपाकडून हे सेलिब्रेशन होत आहे. त्यानंतर, 25 जुलै रोजी राष्ट्रपती शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती राहील. त्यामुळे, राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलण्यात आला असून 26 किंवा 27 जुलै रोजी हा विस्तार होण्याची शक्यता आहे.