भाजपाचे नेते बैठकीसाठी जळगावात आले, पण एकनाथ खडसेच गैरहजर राहिले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 02:36 PM2019-12-07T14:36:45+5:302019-12-07T15:04:40+5:30
भाजपाच्या 5 जिल्हास्तरीय बैठकीत सर्वात आधी धुळे जिल्ह्याची बैठक होत आहे.
जळगाव - भाजपाच्या संघटनात्मक निवडणुकीसंदर्भात उत्तर महाराष्ट्रस्तरीय 5 जिल्ह्यांची बैठक शनिवारी दुपारी जळगावातील औद्योगिक वसाहत भागातील खाजगी रिसॉर्टवर सुरु झाली. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक आदी उपस्थित आहेत. यात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील भाजप जिल्हाध्यक्ष, संघटनमंत्री यात सहभागी झाले आहेत. मात्र, या बैठकीला भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंची अनुपस्थिती लक्षणीय ठरत आहे.
भाजपाच्या 5 जिल्हास्तरीय बैठकीत सर्वात आधी धुळे जिल्ह्याची बैठक होत आहे. पक्षातील पक्षांतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर आज जळगावात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक होत आहे. निर्धारित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अनुपस्थिती आहे. खडसेंनी या बैठकीला दांडी मारली की काय? अशी चर्चा सुरू आहे. एकनाथ खडसे हे विधानसभा निवडणुकांपासून पक्षातील नेतृत्वावर आपली नाराजी दर्शवत आहेत. मात्र, मी भाजपामध्येच आहे अन् राहीन असेही ते ठणकावून सांगत आहे. दोन दिवसांपूर्वीच एकनाथ खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेऊन ओबीसी नेत्यांच्या भेटीगाठीचं समर्थन केलंय. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाव न घेता लक्ष्य केलंय.