खडसेंचा वार, गिरीश महाजन अडचणीत सापडणार..; 1 रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 04:07 PM2024-01-16T16:07:19+5:302024-01-16T16:08:32+5:30
खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला. गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे.
- प्रशांत भदाणे
जळगाव : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यातली लढाई थेट कोर्टात पोहचली आहे. या दोन्ही नेत्यांमधला राजकीय वाद नवा नाही. पण आता या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसतायत. एकनाथ खडसेंनीगिरीश महाजन यांच्यावर थेट वार केलाय. त्यामुळे महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
खडसेंनी मंगळवारी गिरीश महाजनांवर जळगावच्या कोर्टात फौजदारी दावा दाखल केला. गिरीश महाजन हे आपल्या विरोधात वारंवार बदनामीकारक वक्तव्य करत असल्याचा खडसेंचा आरोप आहे. याच अनुषंगाने त्यांनी महाजन यांच्या विरोधात मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी खटला दाखल केला. तर नुकसान भरपाईसाठी दिवाणी न्यायाधीशांकडे 1 रुपयांचा दावा केलाय.
गिरीश महाजन यांनी वारंवार खोटे नाटे विधाने करून मला छळण्याचं काम केलं. तसंच बदनामीकारक वक्तव्य करून समाजात माझी बदनामी केली. मागच्या काळात मी हृदयविकाराने आजारी असतानाही त्यांनी माझ्या आजारपणाबद्दल शंका उपस्थित केली. माझ्या मुलाच्या मृत्यूबद्दल देखील संशयास्पद वक्तव्ये केली. म्हणून मी त्यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल केलाय. तसंच त्यांची किंमत माझ्या लेखी एक रुपयांचीही नाही, म्हणून मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीसाठी भरपाई म्हणून एक रुपयांचा दावा दाखल केला आहे, असे खडसे म्हणाले.
दरम्यान, खडसेंनी गिरीश महाजनांना थेट कोर्टातच खेचलंय. आता गिरीश महाजन त्यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देतील? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.