'आमदारांनी चौकात नाही, विधानसभेत प्रश्न मांडावे’, एकनाथ खडसे यांचे मंगेश चव्हाणांना उत्तर
By आकाश नेवे | Published: October 15, 2022 06:46 PM2022-10-15T18:46:22+5:302022-10-15T18:46:30+5:30
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच एकनाथ खडसे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.
जळगाव: आमदार मंगेश चव्हाण यांनी दूध संघाचा प्रश्न हा कोणत्याही चौकात मांडण्यापेक्षा विधानसभेत मांडावा, तेथे आपण दोन्ही आहोत, अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी मंगेश चव्हाण यांना उत्तर दिले आहे. तसेच हे प्रकरण अपहाराचे नसून चोरीचे आहे. जर दूध संघाच्या पाच वर्षांच्या कारभाराची चौकशी करायची असेल तर ती पोलिसांनी करण्याऐवजी सहकार विभागाने करावी, असेही खडसे यांनी सांगितले.
आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच एकनाथ खडसे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. खडसे म्हणाले की, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. हे चोरीचे प्रकरण असून पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आमदार मंगेश चव्हाण हे संघाचे सभासददेखील नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती कशी मिळते, ते माहितीची चोरी करत आहेत. ते पैसे घेतल्याचे आरोप करत आहेत.त्यामुळे त्यांच्याविरोधात अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही खडसेंनी सांगितले.
ते म्हणाले की, दुध संघात सर्वपक्षीय संचालक होते. त्यात भाजपा आणि शिवसेनेचेही होते. त्यामुळे त्यांच्या संगनमताने सर्व कामे होतात. एकटे चेअरमन काहीही करु शकत नाहीत. गिरीश महाजन यांनीच कापुस भावासाठी उपोषणाची नौटंकी केली होती. त्यावेळी व्हील चेअरवर जाऊन त्यांचे उपोषण आपण सोडवले होते.’
महाजन यांनी खडसे यांची सुरक्षा काढल्याच्या मुद्द्यावरही टिका केली होती. त्यावर खडसे म्हणाले की, ही सुरक्षा सरकारनेच दिली होती. महाजन यांच्या विशिष्ठ गोतवळ्यामुळे त्यांना सुरक्षा व्यवस्था अडचणीची होत असेल. आपल्याला सुरक्षा असली काय आणि नसली काय त्याने काहीही फरक पडत नाही.’ तसेच चव्हाण यांनी आरटीओचे प्रकरण दडपले असल्याचा आरोपही खडसे यांनी केला.