जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या मताधिक्य देण्याच्या आव्हानास एकनाथराव खडसेंचे दमदार उत्तर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:09 PM2019-05-23T23:09:19+5:302019-05-23T23:13:47+5:30
रावेर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना जामनेरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दाखवा’ या जाहीर आव्हानाला माजी मंत्री मथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून जामनेरपेक्षा तब्बल १४ हजार २८५ अधिकच्या मताधिक्याने जोरदार उत्तर दिले आहे.
मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : रावेर येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रक्षा खडसे यांना जामनेरपेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दाखवा’ या जाहीर आव्हानाला माजी मंत्री मथा आमदार एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर मतदारसंघातून जामनेरपेक्षा तब्बल १४ हजार २८५ अधिकच्या मताधिक्याने जोरदार उत्तर दिले आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना ४५ हजार ५७१, तर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून ५९ हजार ८५६ इतके मताधिक्य आहे. संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना खडसेंनी यानिमित्ताने राजकीय मुरब्बीपणा दाखविला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात खासदार रक्षा खडसे यांनी ३ लाख ३५ हजार ८८२ मतांनी विजय मिळविला. यात चोपडा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक ७७ हजार ३३० चे मताधिक्य मिळाले आहे, तर सर्वात कमी रावेर विधानसभा मतदारसंघातून ३९ हजार ३२९ चे मताधिक्य मिळाले आहे.
विधानसभा क्षेत्रनिहाय मताधिक्यात भुसावळ विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४४ हजार ५०६, तर रक्षा खडसे यांना ९५ हजार ३९४ असे मतदान मिळाले आहे. येथे आमदार संजय सावकारे यांनी ५० हजारांचे मताधिक्य देण्याचा दावा केला होता. दिलेल्या शब्दाप्रमाणे ५० हजार ८८८ मतांचे मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. चोपडा विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४९ हजार ३७५, तर रक्षा खडसे यांना १ लाख २६ हजार ७०७ मते मिळाली आहे. या ठिकाणी रक्षा खडसे ७७ हजार ३३० मतांनी पुढे आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ४७ हजार ५३०, तर रक्षा खडसे यांना १ लाख ७ हजार ३८६ मते आहेत. येथे ५९ हजार ८५६ मतांच्या मताधिक्याने रक्षा खडसे पुढे राहिल्या.
रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.उल्हास पाटील यांना ६८ हजार ६७९, तर रक्षा खडसे यांना१ लाख ८ हजार ८ मते मिळाली आहे. याठिकाणी ३९ हजार ३२९ मतांचे मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे. टपाली मतदानातही रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे. यात डॉ.उल्हास पाटील यांना ७६४, तर रक्षा खडसे यांना ३ हजार १७४ मते मिळाली आहे.