महामार्गावर पुन्हा एस.टी.बसच्या धडकेत वृध्द ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:47 PM2019-11-26T12:47:40+5:302019-11-26T12:59:12+5:30
अपघाताची मालिका सुरुच : मॉर्निंग वॉक करुन परतताना दिली धडक
जळगाव : मॉर्निंग वॉक नंतर घराकडे परतत असलेल्या रज्जाक मोहम्मद पटेल (७४ रा. ओमशांतीनगर, खोटेनगर) या वृध्दाला बसने धडक दिल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजता महामार्गावर खोटे नगराजवळ घडली. दरम्यान, खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दुपारी साडे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, रविवारी देखील महामार्गावर जैन कंपनीजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत कंपनीच अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर लागलीच दुसऱ्या दिवशी महामार्गावर हा अपघात झाला.
खोटेनगर परिसरातील ओम शांतीनगरात रज्जाक पटेल हे पत्नी सोफिया मुलगा हारुन यांच्यासह वास्तव्यास होते. हारुन हे मोहाडी येथील माध्यमिक विद्यालयात चित्रकला विषयाचे शिक्षक आहे. मुलगी गुलिस्ता हीचा विवाह झाला असून ती बारडोली, गुजरात येथे सासरी नांदते.
नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी रज्जाक पटेल मॉर्निंग वॉकसाठी महामार्गावर फिरायला गेले होते. यानंतर ११ वाजता घराकडे परत येत असताना जळगावकडे येत असलेल्या कल्याण -रावेर बसने (एम.एच.१४, बी.टी.२३८१) रज्जाक पटेल यांना धडक दिली. यात पटेल गंभीर जखमी झाले. त्यांना बसवरील वाहक किशोर मधुकर सोनवणे यांनी तत्काळ रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले.प्राथमिक उपचारानंतर त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. डोक्यात रक्तश्राव झाल्याने त्यांची प्रकृती गंभीर होती.दुपारी साडे चार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
अपघातानंतर बसचालक पोलीस ठाण्यात हजर
अपघातानंतर बसचालक डिगंबर महाजन हे पोलीस ठाण्यात जमा झाले होते. पघाताची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. बस ताब्यात घेवून पोलीस ठाण्यात आणली. खाजगी दवाखान्यातून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रज्जाक यांना मृत घोषीत करताच पत्नीसह मुलाने आक्रोश केला. बारडोली मुलगी हिस घटना कळविण्यात आली असून ती जळगावकडे येण्यास निघाली.
महामार्गावर दहा दिवसात चार बळी
राष्ट्रीय महामार्गावर गेल्या दहा दिवसात अपघातात चार जणांचा बळी गेला आहे तर एक तरुण जखमी झाला. रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास कंपनीत जात असताना जैन इरिगेशनचे सुपरवायझर राजेंद्र फत्तेसिंग वतपाल (५२) यांचा ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतांना विद्यापीठाच्या प्रवेशव्दारासमोर खड्डा चुकवण्यासाठी प्रयत्नातील दुचाकीस्वार नीलेश अशोक ठाकरे (वय ३४ , रा. निवृत्तीनगर) याला कारने जोरदार धडक दिली होती. वेळीच मदत मिळाल्याने त्याचे प्राण वाचले.त्याआधी आठवडाभरापूर्वी पारोळाजवळ जैन कंपनीचेच कामगार शिरसोली येथील रहिवाशी पती-पत्नी हे दाम्पत्या ट्रकच्या धडकेत ठार झाले होते.
..तर वाचला असता जीव
दरम्यान, सोमवारी रज्जाक पटेल यांना बसने धडक दिल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी नागरिकांनी समांतर रस्ता असता कदाचित रज्जाक पटेल याचा जीव वाचला असता, मात्र समांतर रस्ते नसल्याने आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल रहिवाशांनी केला आहे. रस्त्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे, अजून किती दिवस हे काम चालणार असाच प्रश्न निर्माण होत आहे.