निवडणुकीचा वाजला नगारा अन इच्छुक उमेदवारांचा राम राम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 02:39 PM2020-12-25T14:39:13+5:302020-12-25T14:40:16+5:30
मुदत संपलेल्या एकूण ३३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लागला आहे.
अशोक परदेशी
भडगाव : तालुक्यात मुदत संपलेल्या एकूण ३३ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम लागला आहे. नामनिर्देशन पत्र ऑनलाईन दाखल करण्याचे कामे अंतिम टप्प्यात आले आहे. राजकीय आखाडा चांगलाच तापण्यास सुरुवात झाली आहे. पॅनल प्रमुख उमेदवारांची निवड करीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी पूर्वतयारी करताना दिसत आहेत. निवडणुकीचा वाजला नगारा अन इच्छुक उमेदवारांचा झाला राम राम सुरू असे चित्र तालुक्यात गावोगावी पहावयास मिळत आहे.
या ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. सध्या दि. २३ पासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे काम सुरू आहे. २४ रोजी दोन ग्रामपंचायतींसाठी २ नामनिर्देशन पत्र दाखल झालेले आहेत. यात भडगाव तालुक्यात मुदत संपणार्या या ३३ ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. यात शिवणी, पिंपळगाव बुद्रूक, पिंप्रीहाट, आमडदे, भोरटेक बुद्रूक, सावदे, वडगाव बुद्रूक महिंदळे, वडगाव नालबंदी, वलवाडी बुद्रूक, वाक, भट्टगाव, पिचर्डे, बात्सर, पांढरद, मांडकी, आंचळगाव, कोठली, तांदळवाडी, वाङे, बाळद खुर्द, पळासखेडा , वरखेड, बांबरुड प्र.ब., जुवार्डी, वडजी, लोण प्रभ, पिंपरखेड, गिरड, बांबरुड प्र.उ., मळगाव, खेडगाव, बोदडे, या ग्रामपंचायतींचा सहभाग आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्याने या ग्रामपंचायत निवडणुकांना ब्रेक लागला होता. सुरुवातीस ग्रामपंचायत वार्डातील जागांचे आरक्षण व वार्डरचना यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. अतिम मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना सरपंच पदाचे आरक्षण प्रशासन केव्हा जाहीर करेल याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे पॅनल बांधतांना पॅनल प्रमुखांना अडचणी येताना दिसत आहेत. निवडणुकीचा बिगुल वाजल्याने आतापासूनच राजकीय मंडळी पॅनलची बांधणी करीत आहेत. अनेक इच्छुक, नवखे निवडणूक लढविण्यासाठी गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत आहे. चांगला निवडून येणारा उमेदवार कोण? चांगला उमेदवाराचा शोध पॅनल प्रमुख मंडळी करीत इच्छुक उमेदवारांच्या बैठका पॅनलमार्फत गल्लींमध्ये होताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारही मतदारांशी संपर्क साधताना नजरेस पङत आहेत. इच्छुक उमेदवार मतदारांना राम राम करून मतदान करण्यासाठी जणू आकर्षित करीत आहेत. सर्वत्र ‘राम राम’चा बोलबाला सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झालेली आहे.