जळगावातील प्रभाग ५ मधील मतदार यादीतील घोळाबाबत चौकशी पथक नेमण्याच्या निवडणूक आयोगाच्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:04 PM2018-06-20T13:04:24+5:302018-06-20T13:04:24+5:30
२ हजार २३९ मतदारांचा घोळ
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारुप मतदार याद्यांमधील प्रभाग ५ मध्ये २ हजार २३९ नावांची पडताळणी करून, चौकशी पथक नेमण्याचा सूचना राज्य निवडणूक आयोगाने मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत शुक्रवारी मनपा आयुक्तांना हे पत्र प्राप्त झाले.
मनपा प्रशासनाकडून ५ जून रोजी जाहीर झालेल्या प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचे आढळून आले. त्यामुळे १५ जूनपर्यंत सुमारे २ हजारहून अधिक हरकती मनपा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या. दरम्यान, प्रारुप मतदार याद्यातील घोळ व प्रभाग पाच मधे दोन हजाराच्यावर नावांचा घोळ झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे अॅड. विश्वजीत देशमुख यांनी केली होता. यावर निवडणूक आयोगाने मनपास पत्र दिले असून या प्रकरणी चौकशी पथक नेमून प्रभाग ५ मधील २ हजार २३९ नावांची पडताळणी बीएलओलोच्या माध्यमातून करण्याचे सुचना दिल्या आहे. त्यानुसार बुधवारी या प्रभागात नावांची पडताळणी व तपासणी केल्यानंतर तीन दिवसात हा अहवाल निवडणूक आयोगाला देण्याचे सुचना देखील या पत्रकाव्दारे करण्यात आल्या आहेत.
हरकतींवर पडताळणीचे काम सुुरु
प्रभागनिहाय प्रारुप मतदार याद्यांबाबत आलेल्या हरकतींची प्रभागनिहाय विभागणी केल्यानंतर मनपाकडून हरकतींच्या पडताळणीचे काम सुरु झाले आहे. मनपाचे अभियंते प्रत्यक्ष घरी जावून पडताळणी करून घेत आहेत.
२७ जून रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार होती. मात्र, यामध्ये २ दिवसांची मुदत वाढवून आता २९ जून रोजी अंतीम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
शहरातील १९ प्रभागांपैकी प्रभाग ५ हा मतदारांच्या संख्येनुसार सर्वात मोठा प्रभाग आहे. या प्रभागात २७ हजार १६५ इतकी मतदार संख्या आहे. मात्र, या प्रभागातील लोकसंख्या मतदार संख्येपेक्षा कमी असून या प्रभागात २४ हजार ९६२ इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्येपेक्षा तब्बल २ हजार मते जास्त असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.