इलेक्शन फिव्हर : आचारसंहितमुळे इंंधन दरात दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:49 AM2019-04-10T11:49:18+5:302019-04-10T11:49:43+5:30
महिनाभरात डिझेल झाले दीड रुपयांनी स्वस्त तर पेट्रोल ८० रुपयांच्या खाली
जळगाव : सहा महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी होत असताना भारतात मात्र वाढत गेलेले हे दर आता लोकसभा निवडणुकीमुळे स्थिर ठेवत अथवा कमी-कमी करीत ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचे चित्र आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून (१० मार्च) महिनाभरात डिझेलचे दर प्रती लिटर १.५१ रुपयांनी कमी झाले तर पेट्रोलही प्रती लीटर ८० रुपयांच्या खालीच असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
देशात वेगवेगळ््या राज्यात विधानसभा निवडणूक आली की, इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचा सरकारकडून नेहमी प्रयत्न झाल्याचे विविध राज्यांच्या निवडणुकांवरून दिसून आले आहे.
आता तर देशभरात लोकसभा निवडणुकीची जोरदार धूम सुरू असल्याने इंधन दराकडे सरकारकडून विशेष लक्ष दिले जात असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून वाहनधारकांना सरकारने झटका देण्याऐवजी दिलासा देत निवडणुकीत इंधन दर नियंत्रणात आणल्याची बतावणी करण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांपूर्वी विरुद्ध चित्र
आॅगस्ट महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर इंधनाचे दर कमी असले तरी भारतात ते सातत्याने वाढत गेले होते.
आॅगस्टमध्ये २९ दिवसात पेट्रोलच्या दरात तब्बल १५ वेळा तर डिझेलच्या दरात १९ वेळा वाढ झाली होती. त्या वेळी १ आॅगस्ट रोजी ८४.६८ रुपयांवर असलेल्या पेट्रोलच्या दरात दररोज ८ किंवा १० पैशांनी वाढ होऊन ते ८६.५६ रुपयांवर पोहचले होते. तसेच १ आॅगस्ट रोजी ७१.८१ रुपये असलेल्या डिझेलच्या भावातही वाढ होऊन ते २९ आॅगस्ट रोजी ७३.८६ रुपयांवर पोहचले होते. सप्टेंबर महिन्यात तर पेट्रोलने नव्वदी पार केली होती.
निवडणुकांचे वेध
इंधन दरात वाढ करीत सरकारने मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे खिसे खाली केल्यानंतर देशात निवडणुकीचे वारे सुरू झाले.
राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढ येथील विधानसभा निवडणुका डोळ््यासमोर ठेवून इंधनाचे दर कमी होत गेले अथवा ते स्थिर राहत गेले.
लोकसभा निवडणुकीपर्यंत तर हे दर पाहिले तर नव्वदीच्या पुढे गेलेले पेट्रोल ८० रुपयांच्या आत आहे व डिझेलही ७० रुपयांच्या आत आहे.
महिनाभरात डिझेल १.५१ रुपयांनी स्वस्त
४१० मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर इंधन दरावर सरकारचे विशेष लक्ष असल्याचे चित्र आहे. १० मार्च रोजी ७०.६६ रुपये प्रती लीटर असलेले डिझेल १.५१ रुपयांनी स्वस्त होऊन ते ६९.१५ रुपयांवर आले. विशेष म्हणजे १० मार्च ते ९ एप्रिल दरम्यान ६ एप्रिलचा अपवाद वगळता दररोज डिझेलचे भाव कमी-कमी झाले आहे.
महिनाभरात पेट्रोलचे दर सात वेळा कमी
महिनाभरात पेट्रोलचे दर पाहिले असता दररोज पाच पैसे ते १५ पैशांचा चढ-उतार झाल्याचे दिसून येते. १० मार्चच्या दरात ११ रोजी सहा पैशांनी वाढ झाली. अशात प्रकारे ही वाढ होत जाऊन २१ मार्च रोजी पेट्रोल पुन्हा सात पैशांनी स्वस्त झाले. त्यानंतर वाढ व पुन्हा २८ मार्च रोजी पाच पैशांनी पेट्रोल स्वस्त झाले. अशाच प्रकारे १ एप्रिल, ६ एप्रिल, ७ एप्रिल व ९ एप्रिल रोजी असे महिनाभरात एकूण सात वेळा पेट्रोलचे भाव कमी झाले.
दर आठवड्याची स्थिती
दिनांक पेट्रोल डिझेल
१० ते १६ मार्च २२ पैशांनी वाढ ४१ पैशांनी स्वस्त
१७ ते २३ मार्च १० पैशांनी वाढ ४८ पैशांनी स्वस्त
२४ ते ३० मार्च स्थिर २८ पैशांनी स्वस्त
३१ मार्च ते ६ एप्रिल एक पैशांनी वाढ दोन पैशांनी वाढ
७ ते ९ एप्रिल पाच पैशांनी स्वस्त स्थिर