परिसरात निवडणुकीची धामधूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:39 AM2021-01-13T04:39:12+5:302021-01-13T04:39:12+5:30
नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण परिसरातील गावांत चांगलेच तापत आहे. प्रचाराची धुराळा उडत असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण निर्माण झाले ...
नशिराबाद : ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण परिसरातील गावांत चांगलेच तापत आहे. प्रचाराची धुराळा उडत असल्याने सर्वत्र धामधुमीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नशिराबादला ग्रामपंचायत निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनी माघारी घेऊन इतिहास रचला आहे व नगरपंचायतीची निवडणूक व्हावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाचा व न्यायालयाचा निर्णय अद्याप आलेला नाही. त्यामुळे सध्यातरी निवडणुकीची नशिराबादला सामसूमच आहे. आज आपल्या गावची निवडणूक असती तर आपल्याकडे वर्दळ, रेलचेल गल्लोगल्ली धामधूम दिसली असती हे मात्र तितकेच खरे अशी कोपरखळी रंगत आहे. परिसरातील गावात होत असलेल्या निवडणुकीच्या घडामोडी, उमेदवार, त्यांचा प्रचार याबाबतच्या चर्चा मात्र गावात रंगत आहेत.
परिसरातील गावे लहान असली तरी राजकीयदृष्ट्या ते मात्र महत्त्वपूर्ण आहे. परिसरातील आसोदा, भादली, जळगाव खुर्द, तरसोद आदी गावांमध्ये होत असलेल्या निवडणुकींच्या लढती व प्रचाराचा उडत असलेला धुराळा लक्षवेधक आहे. त्यात कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागले. याबाबतची चर्चा मात्र आता सध्या गावात सुरू आहे. गावात निवडणूक होत नसली तरी परिसरातील गावांच्या लढती उमेदवारांमधला प्रचाराची व्यूहरचना कार्यप्रणाली याबाबतच्या चर्चा होताना दिसत आहे. येथे नगर पंचायत उद्घोषणा झाल्याने ग्रामपंचायतीऐवजी नगर पंचायतीची निवडणूक व्हावी यासाठी नशिराबाद येथे ८२ पैकी ८१ उमेदवारांनी सामूहिक माघार घेतल्याने इतिहास रचला आहे त्यातही एका जणाने माघार न घेतल्याने तो ही इतिहास घडत आहे. त्यामुळे १६ जागा रिक्त असून एक जागा बिनविरोध झाली आहे. तेव्हां नशिराबादला निवडणुकीची सामसूम असली तरी परिसरातील गावांची धामधुमीची चर्चा मात्र गावात रंगत आहे.