जळगाव महापालिका निवडणूक : गणेश सोनवणे व जिजाबाई भापसे यांची प्रतिष्ठा लागली पणाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 02:13 PM2018-07-19T14:13:25+5:302018-07-19T14:15:33+5:30
जळगाव शहरातील सर्वात शेवटचा प्रभाग असलेल्या १९ मध्ये विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे व शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. शिवसेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक रिंगणात आहेत.
जळगाव : शहरातील सर्वात शेवटचा प्रभाग असलेल्या १९ मध्ये विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे व शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला आहे. शिवसेचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे या निवडणूक रिंगणात आहेत.
या प्रभागात प्रस्थापित उमेदवारांसमोर नवख्यांचे आव्हान पहायला मिळणार आहे. मातब्बर उमेदवारांमुळे लढतींबाबत मतदारांमध्ये चर्चा आहे.
जळगाव महानगरपालिका हद्दीतील सर्वात शेवटचा प्रभाग म्हणून १९ क्रमांकाचा प्रभाग आहे. रामेश्वर कॉलनी, सुप्रिम कॉलनी, एमआयडीसी परिसर या प्रभागात येत असतो.
सुरुवातीपासून या प्रभागात माजी मंत्री सुरेश दादा जैन यांचा चांगला प्रभाव राहिला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत जिजाबाई भापसे या नगरसेविका आहेत. तर त्यापूर्वी अण्णा भापसे यांनी या प्रभागातून प्रतिनिधीत्व केले आहे.
सुप्रिम कॉलनी व परिसर हा आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा पूर्वीपासून प्रभाग आहे. यामुळेच या भागातून त्यांच्या पत्नी लता सोनवणे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.
गणेश सोनवणे यांना भाजपाचे आव्हान
१९ ब मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सोनवणे तर क मध्ये विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही उमेदवारांच्या ए.बी.फॉर्मचा गोंधळ झाल्याने दोघांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे. मात्र या दोन्ही उमेदवारांना शिवसेनेने पुरस्कृत केले आहे. गणेश सोनवणे गेल्यावेळी विद्यमान नगरसेवक सुनील चुडामण पाटील यांच्या विरोधात केवळ काही मतांनी पराभूत झाले होते. यावेळी त्यांना भाजपाचे ललित कोळी व काँग्रेसचे सुरेश तितरे यांचे आव्हान राहणार आहे. या जागेवरून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहिदास सोनवणे यांनी माघार घेतली आहे.
जिजाबाई भापसे निवडणूक रिंगणात
प्रभाग १९ क मधून विद्यमान नगरसेविका जिजाबाई भापसे यांची उमेदवारी आहे. त्यांना भाजपाच्या ज्योती विठ्ठल पाटील यांचे आव्हान राहणार आहे.ज्योती पाटील या गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उभ्या होत्या. त्यावेळी जिजाबाई भापसे यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी दोन्ही उमेदवार समोरासमोर निवडणूक रिंगणात आहेत.