जिल्ह्यातील ८३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांच्या प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:40+5:302021-09-27T04:17:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दीड वर्षापासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दीड वर्षापासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून टप्प्या-टप्प्याने जाहीर होणार आहेत. प्राधिकरणाने डिसेंबर २०२० पासून निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका येत्या सहा महिन्यांच्या आत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ८३ सहकारी संस्थांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात पार पडणार असून, यासाठीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.एस.बिडवई यांनी दिली आहे.
कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत; मात्र आता निवडणूक लांबवणे शक्य नसून त्या होतीलच असे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सांगितले आहे. या भूमिकेनंतर प्राधिकरणाने निवडणुकांसाठीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. २० सप्टेंबरपासून निवडणुकीची प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये गृहनिर्माण संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे गृहनिर्माण संस्था सोडून इतर सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यासाठी मतदारांच्या याद्या तयार करुन सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी, असे सहकार प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.
पहिल्या टप्प्यात एकही अ वर्ग संस्थेचा समावेश नाही
डिसेंबर २०२० ते ऑगस्ट २०२१ पर्यंत जिल्ह्यातील १६३७ सहकारी संस्थांचा कार्यकाळ संपला आहे. या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या पाच टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ८३ संस्थांच्या निवडणुका होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील एकाही अ वर्ग सहकारी संस्थांचा समावेश नाही. दरम्यान, ही प्रक्रिया संपल्यानंतर तत्काळ दुसऱ्या टप्प्याच्याही निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे. यामध्ये जिल्हा बँकेच्याही समावेश आहे.
टप्प्यानिहाय होणाऱ्या निवडणुका
१. कोरोनामुळे थांबलेल्या ८३ सहकारी संस्थांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात
२. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपलेल्या २०४ संस्थांच्या निवडणुका होणार.
३. तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२० रोजी मुदत संपलेल्या ६०९ संस्थांच्या निवडणुका होतील.
४. चौथ्या टप्प्यात ३० जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ८० संस्थांच्या निवडणुका होतील.
५. पाचव्या टप्प्यात ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ९० व सहाव्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५२ संस्थांच्या निवडणुका होणार.
६.शेवटच्या टप्प्यात ऑगस्ट २०२१मध्ये मुदत संपलेल्या ५०५ संस्थांच्या निवडणुका होतील.
निवडणुकीस पात्र संस्था
अ वर्ग - ६
ब वर्ग - ७०८
क वर्ग - ६५९
ड वर्ग - २६४
जिल्हा बँक, ग.स.साठी राजकारण तापणार
जिल्हा बँकेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा बँकेसाठी लवकरच रणधुमाळी सुरु होणार असून, त्यानंतर ग.स.सोसायटीसाठीही निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांमधील संचालक मंडळाचीही मुदत संपली आहे. यासह जिल्ह्यातील विकास सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम देखील टप्प्या-टप्प्याने जाहीर केला जाणार आहे.