निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर, सुरेशदादा जैन यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:09 AM2018-07-02T00:09:41+5:302018-07-02T00:10:03+5:30
जनतेपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह पोहोचावे, यासाठी महापालिका निवडणूक ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढविली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी दुपारी दिली.
जळगाव : जनतेपर्यंत शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे चिन्ह पोहोचावे, यासाठी महापालिका निवडणूक ही शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरच लढविली जाणार असल्याची माहिती माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी रविवारी दुपारी दिली. या निर्णयामुळे निवडणुकीत खान्देश विकास आघाडी (खाविआ) असेल की शिवसेना या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
रविवारी सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार आर. ओ. तात्या पाटील, महापौर ललित कोल्हे, माजी महापौर रमेशदादा जैन आदी उपस्थित होते.
... या तर नाण्याच्या दोन बाजू
सुरेशदादा म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेता शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
तसेच खान्देश विकास आघाडी व शिवसेना या एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास आधीही काही अडचण नव्हती आणि आताही ती नाही. त्यामुळे आम्ही मनपा निवडणूक ही शिवसेनेच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.