उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन प्रतिनिधींसाठी ५ रोजी निवडणुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 09:24 PM2018-01-01T21:24:07+5:302018-01-01T21:24:59+5:30
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणुका यावर्षी होणार नाहीत, हे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी परिषदेची स्थापना जुन्याच कायद्यानुसार होणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.१-नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणुका यावर्षी होणार नाहीत, हे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी विद्यार्थी परिषदेची स्थापना जुन्याच कायद्यानुसार होणार आहेत. त्यानुसार उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये ५ रोजी निवडणूका घेवून ८ जानेवारीपर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष व सहसचिवांच्या नावांची यादी विद्यापीठाला पाठवावी लागणार आहे.
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ प्रशासनाकडून ५ जानेवारी रोजी महाविद्यालयीन प्रतिनिधी निवडीसाठी निवडणूका घेण्याचा सूचना उमवि कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना दिल्या आहेत. नवीन विद्यापीठ कायदा लागू झाल्यानंतर विद्यार्थी परिषदेसाठी खुल्या निवडणूका होणार असल्याने विद्यार्थी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले होते. मात्र राज्य शासनाकडून खुल्या निवडणुकांबाबत नियम तयार होवू शकले नसल्याने यावर्षी खुल्या निवडणूका न घेता जुन्याच कायद्याप्रमाणे निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला. तसेच पुढील वर्षी खुल्या निवडणुका घेण्यात येणार आहेत.
८ पर्यंत अध्यक्ष, सचिवांची यादी पाठविण्याचा सूचना
महाविद्यालयांनी ५ जानेवारी रोजी निवडणूका घेवून महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवांच्या नावांची यादी ८ जानेवारीपर्यंत उमवि प्रशासनाकडे पाठवावी लागणार आहे. त्यानंतर ९ जानेवारी रोजी कुलगुरु महाविद्यालयांकडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधींमधून १५ सदस्यांची (१५ पेक्षा जास्तही असण्याची शक्यता) निवड विद्यापीठ विद्यार्थी परिषदेसाठी करणार आहेत. त्यानंतर ११ किंवा १२ जानेवारी विद्यापीठाकडून कुलगुरु नियुक्त सदस्यांची निवडणूक घेवून विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्षांची निवड करणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
महाविद्यालयांमध्ये निवडणुकांच्या हालचाली
महाविद्यालयांमध्ये सत्र परीक्षा संपल्यानंतर तत्काळ विद्यार्थी परिषदेसाठी निवडणुका होत असल्याने विद्यार्थी संघटनामध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविद्यालय प्रशासनाकडून नोटीस बोर्डवर विविध विभागातील टॉपर विद्यार्थ्यांची यादी नोटीस बोर्डवर लावली आहे. या विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष व सचिवाची निवड होणार असल्याने विद्यार्थी संघटनांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. युवासेना, अभाविप, राष्टÑवादी युवक कॉँग्रेससह, एनएसयुआयकडून देखील महाविद्यालय विद्यार्थी परिषदेवर झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
खुल्या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार खुल्या निवडणुका होणार नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. खुल्या निवडणुका न होणे म्हणजेच राज्यशासनाचे अपयश असल्याचीटीका युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रितेश ठाकुर यांनी केली. तर अभाविप ने देखील खुल्या निवडणुकांच्या मागणीसाठी आंदोलन पुकारणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे. दरम्यान, राज्यशासन यंदा खुल्या निवडणुका न घेता, जुन्याच कायद्याप्रमाणे विद्यार्थी परिषदेची स्थापना करणार असल्याच्या तयारीत असल्याची बातमी २७ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकमत’ने प्रसिध्द केली होती. अखेर लोकमतचे वृत्त खरे ठरले आहे.