राज्यातील सात बाजार समित्यांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 04:03 PM2023-04-07T16:03:57+5:302023-04-07T16:04:32+5:30
सहकार विभागाचे निवडणूक प्राधिकरणाला पत्र : भुसावळ आणि बोदवडचा ही समावेश
मतीन शेख, मुक्ताईनगर, जि. जळगाव : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसरीकडे विलीनीकरण आणि विभाजनाच्या मुद्यावर राज्यातील बोदवड आणि भुसावळसह सात बाजार समितीच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे. याबाबत राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाला गुरुवारी पत्र पाठवले आहे.
बोदवड येथील बाजार समिती निवडणूक स्थगित होणार आहे. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणारे वरणगाव उप बाजाराचे भुसावळ बाजार समितीमध्ये विलीनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे भुसावळ बाजार समितीची निवडणूक ही स्थगित होईल. याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद, लासूर स्टेशन, नांदेड जिह्यातील कुंटूर, आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील बाजार समित्यांचे विभाजन करण्यात येणार आहे. तर कारंजा (घा.) येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे येथील निवडणुका स्थगित होण्याची शक्यता आहे.
राज्यात बाजार समितीच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. अशातच राज्य शासनाच्या सहकार पणन विभागाने विलीनीकरण आणि विभाजनाच्या कारणास्तव बोदवड येथील बाजार समितीसह राज्यातील अन्य सात बाजार समितीच्या निवडणुका स्थगित करण्याचे पत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांना ६ एप्रिल रोजी पाठवले आहे.
पत्राच्या अनुषंगाने खुलताबाद बाजार समितीचे लासूर स्टेशन (जि. छत्रपती संभाजीनगर) बाजार समितीत विलीनीकरण, कुंटूर ता. नायगाव (जि. नांदेड) बाजार समितीचे नायगाव (बा.) बाजार समितीत विलीनीकरण, आष्टी, जि. वर्धा येथील बाजार समितीचे विभाजन करुन कारंजा (घा.) येथे स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे वरील बाजार समितीच्या निवडणुका स्थगित करण्यात याव्यात. त्यांचे विभाजन आणि विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात, असे राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणास या पत्राद्वारे सुचविण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"