बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे वाढणार निवडणुकीत चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 11:04 AM2019-03-14T11:04:37+5:302019-03-14T11:05:38+5:30

रावेर मतदार संघ : कोळी, मुस्लीम व दलित मतदारांची भूमिका लक्षवेधी

Elections will be increased due to the disadvantaged candidates of the Bahujan Samaj Party | बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे वाढणार निवडणुकीत चुरस

बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांमुळे वाढणार निवडणुकीत चुरस

Next
ठळक मुद्देधुळ्यात काँग्रेसला फटका बसण्याची भिती


जळगाव/धुळे : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व बहुजन वंचित आघाडीचे सूत्र न जमल्याने त्याचा प्रभाव रावेर, धुळे लोकसभा मतदार संघावर दिसून येणार आहे. मुस्लीम व दलित मतदारांचा प्रभाव असलेल्या या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने रंगत येणार आहे.
रावेर लोकसभा मतदार संघासाठी बहुजन वंचित आघाडीतर्फे भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी नितीन कांडेलकर यांची उमेदवारी घोषित केली आहे.
त्यांच्या आई जानकीबाई कांडेलकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादीकडून जि.प.सदस्यपद भूषविले आहे. मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात सुमारे ३५ हजार कोळी समाजाचे मतदार आहेत. त्यापाठोपाठ रावेर व यावल तालुक्यात कोळी समाजबांधवाची मोठी लोकसंख्या आहे.
भारिप सोबत एमआयएम असल्याने दलित व मुस्लीम मतदारांचा प्रभाव असलेल्या भुसावळ विधानसभा मतदार संघातदेखील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात मतदान घेण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांची मुक्ताईनगरात तर नगरपालिका निवडणुकीपूर्वी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भुसावळात सभा झाली.
त्यामुळे बहुजन वंचित आघाडीने रावेर लोकसभा मतदार संघातील लढतीत रंगत निर्माण केली आहे.
काँग्रेसचे हक्काचे मतदार असलेले दलित व मुस्लीम मतदाराचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
मुक्ताईनगरातील अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या सभेत त्यांनी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याबद्दल बोलणे टाळले हे विशेष आहे.
त्यातच मुस्लीम समाज बांधवांच्या जमिनीवर अंबानी कुटुंबियांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आपल्याला दूर केल्याचे खळबळजनक विधान करीत मुस्लीम समाजाला त्यांनी सोबतच्या घेण्याचा प्रयत्न केला आहे.
नंदुरबारला प्रभाव नाही
नंदुरबार लोकसभा मतदार संघातूनही बहुजन वंचित आघाडीकडून उमेदवार दिला जाणार आहे. त्यासाठी तीन जण इच्छुक आहेत. मात्र नंदुरबार हा परंपरागत काँग्रेसचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. तर गेल्या पंचवार्षिकपासून भाजपाने या मतदारसंघावर वर्चस्व मिळविले आहे. त्यामुळे बहुजन वंचित आघाडीने उमेदवार देऊनही निवडणुकीच्या गणितावर फारसा फरक पडण्याची चिन्ह नसल्याचे जाणकारांचे मत आहे.
मात्र निवडणुकीचा प्रचार सुरू होईल, वातावरण तापेल, त्यानंतर कितपत मतपरिवर्तन होते? यावर गणित अवलंबून आहे.
धुळ्यात काँग्रेसला फटका बसण्याची भिती
धुळे लोकसभा मतदारसंघात बहुजन वंचीत आघाडीतर्फे मालेगावचे अभियंता कमाल हसन हासीम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ फेब्रुवारीमध्ये मालेगाव येथे बहुजन वंचीत आघाडीतर्फे एमआयएमचे असदूद्दीन औवेसी आणि डॉ. प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभाही झाली आहे. हासीम यांच्या उमेदवारीने काँग्रेस आघाडीला फटका बसेल. गेल्यावेळेस काँग्रेसच्या उमेदवाराला लोकसभा मतदारसंघात मालेगाव येथूनच फक्त लीड मिळाला होता. यंदा तेथूनच कमाल हसन हासीम यांची उमेदवारी जाहीर झाल्याने मालेगावसह धुळे जिल्ह्यातही याचा परिणाम जाणवेल. कारण यंदा महापालिका निवडणुकीतसुद्धा काँग्रेसचे वर्चस्व समजल्या जाणाऱ्या प्रभागातूनच एमआयएमचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. लोकसभेला जर तोच ‘ट्रेंड’ राहिला तर काँग्रेसला याचा फटका बसणार आहे.
भारिप बहुजन महासंघाचे मतदारसुद्धा बहुजन वंचीत आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याने काँग्रेसचे याठिकाणीही नुकसानच होणार आहे. एकूणच बहुजन वंचीत महासंघातर्फे उमेदवार उभा केल्याने त्याचा फटका हा काँग्रेस - राष्टÑवादी आघाडीलाच बसणार आहे.
मालेगाव येथील सभेत डॉ. प्रकाश आंबेडकर यांनीच कमाल हसन हासीम यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती. परंतु अद्याप एमआयएमतर्फे यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. यासंदर्भात बुधवारी सकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल, असेही नाव न सांगण्याच्या अटीवर एमआयएमचे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

Web Title: Elections will be increased due to the disadvantaged candidates of the Bahujan Samaj Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.