सुरक्षिततेच्या दृष्टीने चार दिवसात रुग्णालयांचे इलेक्ट्रिक ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:16 AM2021-04-25T04:16:12+5:302021-04-25T04:16:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यातील कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय व खासगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यातील कोरोना रुग्णालयांना लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने शासकीय व खासगी रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा आढावा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेतला. यासोबतच आता येत्या चार दिवसात रुग्णालयांचे इलेक्ट्रिक ऑडिटदेखील करून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग वाढला त्यानंतर विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन तसेच इतर उपाययोजनांना वेग आला. यासोबतच राज्यात कोविड रुग्णालयांमध्ये आगी लागण्याच्या घटना सातत्याने घडत असल्याचे समोर येत आहे. भांडुप येथे रुग्णालयाची आग व त्यानंतर शुक्रवार २३ एप्रिल रोजी विरार येथे लागलेल्या रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेमुळे हा विषय ऐरणीवर आला आहे. राज्यासह इतर ठिकाणीदेखील रुग्णालयांना आगीच्या घटना लागत असल्याचे वारंवार समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातदेखील सुरक्षिततेच्या दृष्टीने उपायोजना करण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महापालिका, आयएमए पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून फायर ऑडिटविषयी सूचना दिल्या.
तात्पुरत्या ठिकाणी उद्भवतात अडचणी
कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्यासाठी बेड व इतर सुविधा उपलब्ध कराव्या लागत आहे. मात्र जे रुग्णालये आहे ते महापालिका अथवा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पूर्तता प्रमाणपत्र घेते त्या वेळी त्यांचे फायर ऑडिट झालेले असते. यात शासकीय रुग्णालय व इतर खासगी रुग्णालय या ठिकाणी धोका नाही, मात्र तात्पुरत्या स्वरूपात ज्या ठिकाणी सुविधा केल्या जातात त्या ठिकाणी अधिक धोका असतो. त्या दृष्टीने उपायोजना करण्याविषयी जिल्हाधिकारी राऊत यांनी संबंधितांना सूचना दिल्या आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी त्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आहे की नाही तसेच आग लागल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठी पूरक गोष्टींची उपलब्धता आहे आहे की नाही, याचीदेखील खात्री करून घेण्याविषयी सूचना देण्यात आल्या. रुग्णालयांच्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठे पाईप आवश्यक असून ज्या-ज्या ठिकाणी ते नसतील तेथे ते उपलब्ध करून द्यावे, असेदेखील सूचित करण्यात आले.
इलेक्ट्रिक ऑडिट
महापालिका व आयएमएकडून फायर ऑडिटचा आढावा घेण्यासह जिल्ह्यातील रुग्णालयांचे चार दिवसात इलेक्ट्रिक ऑडिटदेखील करून घेण्यात येईल, जेणेकरून कोणत्याही कारणावरून आगीची घटना घडू नये व रुग्ण तसेच सर्वजण सुरक्षित राहावे यासाठी दक्षता घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.
जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल व कोविड केअर सेंटर
शासकीय - २५
खासगी -११२