वाघडूच्या भिल्ल वस्तीत दिपोत्सवाच्या पर्वावर उजळले विजेचे दिवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 01:52 PM2020-11-07T13:52:29+5:302020-11-07T13:54:05+5:30
५० वर्षापासून अंधारात राहणारी वस्ती उजळली
चाळीसगाव
त्यांची प्रत्येक दिवाळी अंधारात आली अन् गेलीही. यावर्षी मात्र ५० वर्षापासून अंधारात बुडालेली वस्ती दिवाळीपूर्वीच विजेच्या दिव्यांनी लखलखून गेलीयं. आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार निधीतून साडेसहा लाख रुपयांची निधी उपलब्ध करुन दिला आहे. वाघडू येथील भिल्ल वस्तीतील प्रत्येकाचा चेहरा विजेची सोय झाल्याने आनंदानेही झळाळून निघाला आहे. शुक्रवारी मंगेश चव्हाण यांनी वस्तीत येऊन भिल्ल बांधवांसोबत हा प्रकाशोत्सव साजरा केला.
वाघडू येथून जवळच असलेली आदिवासी भिल्ल वस्तीत १५ ते २० कुटुंब गेल्या ५० वर्षांपासून वास्तव्यास आहे. मात्र जशी वस्ती झाली. तसे त्यांच्या नशिबी अंधारच होता. साधा विजेचा प्रकाशही त्यांच्यापर्यंत पोहचला नव्हता.
भिल्ल वस्तीतील विजेच्या गैरसोयीबाबत भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना सांगितले. यानंतर चव्हाण यांनी तात्काळ जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून साडेसहा लाख रुपये प्रस्तावित केले. वस्तीवर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीज पोहचल्याने त्याचे लोकार्पण मंगेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. दिवाळीच्या पर्वावर विजेची सोय उपलब्ध करुन देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळे याबांधवांच्या चेह-यावर उजळलेला आनंद माझ्यासाठी दिवाळीची भेटच असल्याची प्रतिक्रिया आमदारांनी व्यक्त केली.
यावेळी आदिवासी भिल्ल कुटुंबबियांनी आमदारांचे औक्षण करत त्यांना पेढे भरवले. आज फक्त आमच्या घरात वीज पोहचली नसुन आमच्या जीवनात प्रकाश देण्याच काम आमदार साहेबानी केल असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे, पंचायत समिती भाजपा गटनेते संजय भास्करराव पाटील, आबा पाटील, मधुकर पाटील, राहुल पाटील, गुलाब पाटील, मनोज पाटील, रवींद्र पाटील, सुदाम पाटील, बाप्पु पाटील, अमोल पाटील, अरूण पाटील, गणेश पाटील, बाळासाहेब पाटील, अनिल पाटील, छगन गायकवाड, भगवान गायकवाड, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.