जामनेरला विजेचे ट्रान्सफार्मर जळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 05:37 PM2019-04-27T17:37:42+5:302019-04-27T17:38:12+5:30
तापमानात वाढ : मेन रोडवरील घटना
जामनेर : येथील अराफत चौकातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या ट्रान्सफार्मरने शनिवारी दुपारी साडेबाराचे सुमारास अचानक पेट घेतला. उन्हाची तीव्रता सकाळी दहा वाजेपासुनच वाढल्याने यावेळी रस्ता निर्मनुष्य असल्याने सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.
वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफार्मरमधील तेलाने पेट घेतल्याने हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे. दुभाजकावर असलेल्या या ट्रान्सफार्मर जवळच रिक्षा, मालवाहू वाहने थांबलेली असतात. अचानक पेट घेतल्याने या भागातील दुकानदारांसह नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली.
आगीच्या या घटनेनंतर अराफत चौक, बिस्मील्ला नगर, मुजावर मोहल्ला, ईस्लामपुरा, श्रीराम पेठ भागातील विज पुरवठा सायंकाळ पर्यंत बंद होता. आधीच वाढलेले तापमान त्यात विज पुरवठा बंद झाल्याने नागरीक कमालीचे त्रस्त झाले होते.
विज वितरण कंपनीने दाट वस्तीत असलेले मुख्य रस्त्यावरील ट्रान्सफार्मर इतरत्र हलवीण्याची मागणी नागरीकांकडुन केली जात आहे. किंवा त्याची योग्य देखभाल तरी करावी अशी अपेक्षा असून नगरपालिका कार्यालयासमोरील ट्रान्सफार्मर जवळ हातगाडी विक्रेत्यांची गर्दी असल्याने तो केव्हाही धोकादायक ठरु शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.