नशिराबादला विजेचे खांब ग्रामस्थांंच्या उठले जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 11:29 AM2020-06-06T11:29:46+5:302020-06-06T11:29:57+5:30
नशिराबाद : येथे गंजलेले वीज खांब आणि रस्त्यावर काही ठिकाणच्या विद्युत वाहिन्यांमुळे येथील ग्रामस्थांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. ग्रामस्थांच्या ...
नशिराबाद : येथे गंजलेले वीज खांब आणि रस्त्यावर काही ठिकाणच्या विद्युत वाहिन्यांमुळे येथील ग्रामस्थांवर मृत्यूची टांगती तलवार आहे. ग्रामस्थांच्या जीवाला धोका असताना, याकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने येथे दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गेल्या महिन्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने मान्सूनपूर्व विजेच्या तारा, ट्रान्सफॉर्मर नव्याने टाकले आहेत. काही ठिकाणी वीजतारांना अडथळा येणाºया झाडांच्या फांद्या तोडल्या. मात्र काही ठिकाणचे सडलेले विजेचे पोल बदलण्यात आलेले नाहीत तर काही डिपी उघडे आहेत. त्यामुळे दुर्घटनेची शक्यता वाढली आहे. याबाबत वीज कार्यालयात वारंवार कळविले आहे. त्यातच वीजेचा लपंडाव होत असल्यामुळे व्यावसायिकांसह नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. नशिराबाद येथे गावात व परिसरात गंजलेले व जीर्ण झालेले वीज खांब त्वरित बदलण्यात यावेत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
वारा व पावसामुळे गंजलेले जीर्ण खांब कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुरू असलेल्या वीज पुरवठ्यात जीर्ण गंजलेले खांब तुटून दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही ठिकाणचे खांब अर्ध्यातूनच झुकले आहे तर काही जमिनी पासूनच गंजलेले व तुटक्या अवस्थेत आहे. मुख्य वर्दळीच्या ठिकाणी ही बिकट अवस्था असल्याने ग्रामस्थ धास्तावले आहे. गावात या परिसरातून वीज अधिकारी व कर्मचारीवर्ग नियमित ये-जा करतात. मग त्यांनाही खांब दिसत नाहीत का? काही ठिकाणी तर आकडे टाकून वीजपुरवठा सुरू आहे. मग याकडे दुर्लक्ष का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहे. साथीबाजार चौक परिसरात विद्युत पुरवठा करणारी वीज तार तुटण्याच्या अवस्थेत आली आहे. गावात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वीज, तारांना अडचणीचे ठरत आहे.
दरम्यान, वीज कार्यालय गावाबाहेर असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महामार्ग ओलांडून तक्रार करायला जावे लागते. त्यामुळे पूर्वीप्रमाणे गावातच वीज कार्यालय असावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली
आहे.
आकडे टाकून वीज सुरू
येथे काही ठिकाणी खुलेआम आकडे टाकून वीजचोरी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे, वीजबिले थकीत झाले तर लागलीच वीजपुरवठा खंडित करण्यासाठी वसुली पथक कर्मचारी येतात. बिल न भरल्यास वीजपुरवठा प्रसंगी खंडीत केला जातो. मात्र खुलेआम आकडे टाकून अवैध पद्धतीने वीज चोरी करणाऱ्यांवर कार्यवाही का नाही, फक्त सर्वसामान्यांनाच त्रास का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
मृत्यूला आमंत्रण...
गावातील अनेक ठिकाणी जीर्ण व गंजलेले वीज खांब मृत्यूला आमंत्रण देत आहे. त्यात रामपेठ चौक, धनगर खिडकी, खाटीक वाडा, न्यू इंग्लिश स्कूलजवळ, वरची आळी परिसर, बन्नातबुवा मंदिराजवळ, साती बाजार चौक यासह अनेक ठिकाणी वीज खांबांची दैनावस्था आहे. अनेकदा संबंधित परिसरातील नागरिकांनी तुटक्या व गंजलेल्या वीजखांबाबाबत तक्रारी दिल्या. मात्र वीज कंपनीकडून याकडे दुर्लक्ष हलगर्जीपणा याचे प्रदर्शन घडविले जात आहे. दुर्घटना घडल्यानंतरच वीज खांब बदलणार काय? असा संतप्त सवाल आता ग्रामस्थांनी केला आहे.
दूरध्वनी नॉट रिचेबल
येथे वीज समस्यांबाबत तक्रार देण्याकरता वीज कार्यालयाचा दूरध्वनीवर कॉल केला असता तो नॉट रिचेबल येतो. चौपदरीकरणाच्या कामात बीएसएनएलचे केबल टाकण्यात येत होते, त्यावेळेपासून तो दूरध्वनी मोबाईलवर संलग्न केला असल्याचे माहिती वीज कार्यालय देते. मात्र नेटवर्क कव्हरेज किंवा अन्य काही समस्यांमुळे दूरध्वनी बंद असल्याचा अनुभव ग्राहकांना येत असल्याची ओरड आहे. त्यामुळे तक्रार करण्यासाठी नागरिकांना अडचणींची शर्यत असते.
अधिकारी,
लोकप्रतिनिधी गप्प...
जीर्ण व गंजलेल्या खांबामुळे उद्भवणाºया धोक्याबाबत वीज कंपनीचे अधिकारी व लोकप्रतिनिधी गप्प का? यासंदर्भात कोणीही दखल घेऊन कार्यवाहीबाबत पावले उचलत नसल्याने खंत व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी व पुढाºयांनी याबाबत पाठपुरावा करून वीज अधिकाºयांना जाब विचारावा व जीर्ण खांब बदलविण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गंजलेले खांब, तारा, बदलण्याचा मुहूर्त वीज कंपनीला कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे.