जळगावात संतप्त नागरिकांनीच काढले वीज चोरीचे आकोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 02:17 PM2018-06-25T14:17:24+5:302018-06-25T14:21:19+5:30
आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उतरून रोहित्रावरील आकोडे काढले़
जळगाव : आकोड्यांच्या विद्युत भारामुळे रोहित्र जळाल्याने गेल्या तीन दिवसांपासून आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता़ त्यामुळे रोहित्रावरील आकोडे काढल्यावरच दुरूस्तीची कामे होतील असा पवित्रा महावितरण कर्मचाऱ्यांनी घेतल्याने संतप्त रहिवाशांनी रविवारी दुपारी ४ वाजता रस्त्यावर उतरून रोहित्रावरील आकोडे काढले़ दीड तास हा गोंधळ सुरू होता़ त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता़
आसोदा रस्त्यावरील तानाजी मालुसरे नगरातील रोहित्रावर दोन फिडरचे फेज एकत्र आहेत़ त्यामुळे एकाच भागातील शेकडो नागरिकांनी या रोहित्रावर आकोडे टाकून वीजपुरवठा घेतला आहे़ ज्यांच्याकडे वीजमीटर आहेत त्यांनी सुध्दा या रोहित्रावर आकोडे टाकले होते़ यामुळे क्षमतेपेक्षा जास्त वीजभार रोहित्रावर पडला आहे. परिणामी शुक्रवारी संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला़ तर काही भागात कमी दाबाचा वीजपुरवठा सुरू होता़ एक दिवस उलटून सुध्दा वीज सुरळीत न झाल्यामुळे तानाजी मालुसरे नगरातील अधिकृत वीजमीटर असलेल्या काही महिलांनी शनिवारी दुपारी ४ वाजता दीक्षितवाडीतील महावितरणाच्या कार्यालयात धाव घेत तक्रार दाखल केली़ त्यानंतर रविवारी देखील वीज सुरळीत न झाल्यामुळे पुन्हा दुपारी मंगला सोनवणे, सरला सोनवणे, मयुर ठाकरे, शाम मराठे यांच्यासह रहिवाश्यांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली़ मात्र, जो पर्यंत रोहित्रावरील आकोडे काढल्याशिवाय दुरुस्ती शक्य नसल्याचा पवित्रा महावितरणने घेतला. महावितरणच्या कर्मचाºयांनी देखील विद्युत खांबावर चढून आकोड्यांच्या तसेच रोहित्रावर असलेल्या वायर्स कापल्या.
काही महिलांनीच रोहित्राजवळ येऊन आकोडे काढण्यास सुरुवात केली. बघता-बघता शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले़ त्यानंतर आकोडे टाकलेल्यांनीच पुढे येत आपले आकोडे काढण्यास सुरुवात केली. यामुळे रस्त्यावर रहिवाश्यांची प्रचंड गर्दी झाली होती़ याबाबत पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर शनिपेठ पोलीस ठाण्यात कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले होते़