सावदा येथे हॉटेलमध्ये वीज चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 07:29 PM2019-04-24T19:29:50+5:302019-04-24T19:31:01+5:30
सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
यावल, जि.जळगाव : सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये, तर फैजपूर येथे एका घरगुती ग्राहकाकडील वीज चोरी वीज वितरण कंपनीने पकडली. दोघांनी ७२ हजार रुपये किमतीची वीज चोरी केल्याचा गुन्हा बुधवारी यावल पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाने ही कारवाई केली. यामुळे खळबळ उडाली आहे.
सूत्रांनुसार, सावदा येथील हॉटेल महेंद्रमध्ये विद्युत उपकरणासाठी अधिकृत वीजपुरवठा न घेता, विनापरवानगीने विजेचा वापर करण्यात येत असल्याचे भरारी पथकाच्या अचानक तपासणीत आढळले. दोन महिन्यांपासून विजेचा अनधिकृतपणे वापर करण्यात येत होता. यामुळे ८७० युनिटचा वापर करून हॉटेल व्यवस्थापनाने १३ हजार ६४१ रुपयांची वीज चोरी केली. यावरून या हॉटेलचे मालक सुभाष रामभाऊ चौधरी आणि ही हॉटेल चालविण्यासाठी घेतलेले रामभाऊ कडू महाजन यांच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय फैजपूर येथील मिन्नत नगरातही तपासणीत घरगुती वापरासाठी वीज चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. तन्वीरखान अजमलखान यांनी ११ एप्रिल २०१७ ते ११ एप्रिल २०१९ या कालावधीत घरगुती विद्युत उपकरणासाठी तीन हजार ७६१ युनिटचा बेकायदा वापर केला. यानुसार ५८ हजार ७९६ रुपये किमतीच्या विजेची चोरी केली. म्हणून तन्वीरखान अमजलखान यांच्याविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज वितरण कंपनीच्या भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एच.वाय. ठोसरे यांनी ही फिर्याद दिली आहे. सावदा येथील हॉटेलमधील वीज चोरीचा गुन्हा सावदा पोलिसांकडे, तर फैजपूर येथील वीज चोरीचा गुन्हा फैजपूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.