पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

By विजय.सैतवाल | Published: June 15, 2024 09:56 PM2024-06-15T21:56:05+5:302024-06-15T21:56:17+5:30

१३७ जागांसाठी ६५५७ अर्ज : १९ जूनपासून चाचणीसह लेखी परीक्षा

Electronic chip will be used for accurate registration in police recruitment says Dr. Maheshwar Reddy | पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

पोलिस भरतीमध्ये अचूक नोंदणीसाठी होणार इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर - डॉ. महेश्वर रेड्डी

जळगाव : पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबविली जात असून जळगाव जिल्ह्यात १३७ जागांसाठी १९ जूनपासून शारीरिक चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यासाठी सहा हजार ५५७ अर्ज आलेले असून २५ जूनपर्यंत चाचण्या पूर्ण होतील. यातील उत्तीर्ण उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. चाचण्यांच्या अचूक नोंदणीसाठी या वेळी इलेक्ट्रॉनिक चिपचा वापर होणार असून यातून थोडीही तफावत राहणार नाही, असा विश्वास जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केला. पोलिस भरतीसंदर्भात माहिती देण्यासाठी शनिवार, १५ जून रोजी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली.

पहिले सहा दिवस पुरुष व सातव्या दिवशी महिला उमेदवारांची चाचणी

पोलिस भरतीसाठी १९ जूनपासून चाचण्यांना सुरुवात होणार आहे. यामध्ये पहाटे साडेचार वाजता उमेदवारांना हजर रहावे लागणार आहे. पहिल्या दिवशी अर्थात १९ रोजी ५०० पुरुष उमेदवार, दुसरा दिवस २० जून ते २३ जून दरम्यान प्रत्येक दिवशी एक-एक हजार उमेदवारांना तर २४ रोजी ७२४ उमेदवारांना चाचणीसाठी बोलविले जाणार आहे. त्यानंतर २५ जून रोजी एक हजार ३६२ महिला उमेदवार व एक तृतीय पंथीय उमेदवारास बोलविले जाणार आहे.

‘उंची, छाती’त जो उत्तीर्ण तोच जाणार पुढे

प्रत्येक दिवशी आलेल्या उमेदवारांना प्रथम वाहतूक शाखेनजीक बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तेथे अर्ज भरल्यानंतर ५०-५० जणांना पुढे पाठविले जाईल. तेथे उंची, छाती, छाती फुगवणे यांची मोजणी होईल. त्यात जो उत्तीर्ण होईल, त्यालाच पुढे पाठविले जाणार आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी होऊन मूळ कागदपत्रे (ओरिजनस डॉक्युमेंट) जमा करण्यात येणार आहे. तेथून पुढे बायोमेट्रीक फिंगरप्रिंट घेऊन त्यांना चेस्ट क्रमांक देण्यात येईल.

त्याच दिवशी गुण समजणार

उमेदवारांकडून १०० मीटर, १६०० मीटर धावणे, गोळाफेक यांचे प्रात्यक्षिक करुन घेण्यात येईल. यासाठी कोण किती वेळात किती धावले, याच्या अचून नोंदणीसाठी उमेदवारांच्या पायावर चिप लावण्यात येईल. त्यानंतर सुरूवात ते शेवट या ठिकाणी असेल्या मॅटवर त्याचा स्पर्श होईल नोंद होईल. यामुळे मायक्रो सेकंदचीही तफावत येणार नाही. तसेच यातून कोणाकडून कोणताही आरोप होणार नाही, असे डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले. ज्या उमेदवारांची चाचणी झाली, त्याच दिवशी त्यांचे गुण प्रदर्शित केले जाणार आहे.

मानवी हस्तक्षेप नाही, प्रलोभलांना बळी पडू नये

संपूर्ण भरती प्रक्रियेवर सीसीटीव्हींची नजर राहणार असून यात कोणताही मानवी हस्तक्षेप राहणार नाही. पोलिस भरतीसाठी उमेदवारांना कोणी मदत करणार असल्याचे सांगत असेल तर त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व त्यांच्या प्रलोभलांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.

डीवायएसपींकडे प्रथम अपील

भरती प्रक्रियेविषयी काही तक्रार असल्यास त्याची पहिले अपील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करता येईल. त्यानंतर दुसरे अपील पोलिस अधीक्षकांकडे करता येऊ शकते. यात सर्व अर्ज ऑनलाईन स्वीकारण्यात आले असून प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध आहे. आलेल्या एकूण अर्जांमध्ये २० टक्के महिला आहेत.

लेखी परीक्षेचा मेसेज

जे उमेदवार चाचणीमध्ये उत्तीर्ण होऊन लेखी परीक्षेला पात्र ठरतील त्यांना तसा मेसेज पाठविला जाणार आहे. बाहेर गावाहून जे उमेदवार येतील त्यांना इमर्जन्सी म्हणून मल्टीपर्पज सभागृहात राहता येऊ शकते, असेही पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी सांगितले.

भरतीसाठी मनुष्यबळ

पोलिस अधीक्षक - १
अप्पर पोलिस अधीक्षक - २
उपविभागीय पोलिस अधिकारी - ५
पोलिस निरीक्षक -१०
पोलिस उपनिरीक्षक -१५
पोलिस कर्मचारी - ३५०

Web Title: Electronic chip will be used for accurate registration in police recruitment says Dr. Maheshwar Reddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.