पारोळा येथे अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:14 PM2018-03-14T13:14:52+5:302018-03-14T13:22:43+5:30
राहत्या घरी दोरीने गळफास
आॅनलाइन लोकमत
पारोळा, जि. जळगाव, दि. १४ - एन. ई. एस. हायस्कूल चा ११ वी इयत्ता शिकणारा अनुप प्रदीप भावसार (१७) याने १४ मार्च रोजी सकाळी ९.५० वाजता राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
एन. ई. एस. हायस्कूलचा विद्यार्थी अनुप हा इयत्ता ११ वी विज्ञान शाखेला शिकत होता. दररोज दोघे भाऊ अनुप आणि लहान बहीण सकाळी क्लासला बरोबर जात आणि बरोबर क्लास आटोपून घरी येत. नेहेमी प्रमाणे आज सकाळी ८ वाजता दोघे जण घरून क्लाससाठी बरोबर निघाले. वडील प्रदीप भावसार व आई हे दोन्ही गावातच बालाजी प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते नेहेमी प्रमाणे सकाळी ७ वाजता शाळेत गेले होते. अनुप हा आज बहिणी सोबत क्लास आटोपून घरी न येता १० ते १५ मिनिटे लवकर घरी आला आणि घरातील एका खोलीत छताला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. बहीण १० मिनिटांनी घरी आली तर खोलीत भाऊ अनुप याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिने आरडाओरडा करीत शेजारच्या लोकांना बोलावले. त्यांनी अनुपचा मृतदेह कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र अनुपचा मृत्यू झाला होता. बहीणने या विषयी आई वडीलांना माहिती दिली. ते शाळेतून तात्काळ घरी आले. अनुपला पाहून आईने एकच आक्रोश केला.
अनुपने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकेल नाही. पारोळा पोलीस ठाण्यात सतीश भावसार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.