किनोद ग्रामस्थांचा अवैध वाळू उपशाविरोधात एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:20 PM2019-05-07T12:20:19+5:302019-05-07T12:20:40+5:30
तापी पात्रात उतरून १२ ट्रॅक्टर अडविले
जळगाव : तालुक्यातील किनोद या गावाच्या तापी नदीपात्रात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाविरोधात सोमवारी ग्रामस्थांनी एल्गार पुकारत, तब्बल १२ ट्रॅक्टर अडविले. याबाबत ग्रामस्थांनी महसूल विभागाला कळविल्यानंतर दोन तासानेही अधिकारी घटनास्थळी पोहचले नाही. त्यामुळे वाळू माफिया व ग्रामस्थांमध्ये किरकोळ वाद झाला. अखेर तीन तासानंतर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने घटनास्थळी जावून १२ ट्रॅक्टर जप्त केले.
चोपडा तालुक्यातील सुटकार या गावाच्या तापी नदीचा तीन गटांचा ठेका देण्यात आला आहे. मात्र, काही महिन्यांपासून वाळू माफियांकडून या अधिकृत ठेक्यावरून वाळू उपसा न करता किनोद, सावखेडा, भादली या भागातील नदीपात्रातून अवैध उपसा केला जात आहे. याबाबत या तीन्ही गावांच्या ग्रामस्थांनी महसुल विभागाकडे वेळोवेळी तक्रार करून देखील कोणतीही कारवाई प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी नदीपात्रात जावून वाळू उपसा रोखण्याचा प्रयत्न केला.
दशक्रिया विधीदरम्यान ग्रामस्थ आले एकत्र
सोमवारी किनोद गावातील नागरिक दशक्रिया विधीसाठी नदीपात्रात गेले होते. हा विधी आटोपल्यानंतर नदी पात्रात सुमारे ५० हून अधिक ट्रॅक्टर व डंपरव्दारे वाळू उपसा होत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर ग्रामस्थांनी ट्रॅक्टर पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही डंपर चालकांनी नदीपात्रातून पळ काढला. तर ग्रामस्थांनी १२ ट्रॅक्टरच्या टायरची हवा काढल्यामुळे हे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
प्रशासनाकडून हलगर्जीपणा का ?
दोन आठवड्यापूर्वी आव्हाणे ग्रामस्थांनी गिरणा नदीपात्रात २० हून अधिक ट्रॅक्टर जप्त केले होते. मात्र, चार तास थांबून देखील प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नाईलाजास्तव ग्रामस्थांना ही वाहने सोडून द्यावे लागली. हिच परिस्थिती किनोद येथे पहायला मिळाली. या ठिकाणीही पोहचायला प्रशासनाने तीन तास लागले. जे काम प्रशासनाने करायला पाहिजे होते. ते ग्रामस्थांकडून होत असतानाही प्रशासनाने कार्यतत्परता दाखविण्याची गरज आहे.
सुस्त प्रशासन पोहचले उशीरा
सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास ग्रामस्थांनी १२ ट्रॅक्टर पकडल्यानंतर याबाबत तहसीलदार वैशाली हिंगे यांना फोनवरून माहिती दिली. मात्र, दोन तास झाल्यानंतर देखील कोणताही अधिकारी घटनास्थळी न पोहचल्याने काही वाळू माफियांनी ग्रामस्थांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. तसेच जप्त करण्यात आलेल्या १२ ट्रॅक्टरचे मूळ मालक चोपडा, यावलहून घटनास्थळी पोहचले. पण तालुक्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले नव्हते, अशी माहिती कि नोद ग्रामस्थांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास तहसीलदार वैशाली हिंगे या आपल्या पथकासमवेत घटनास्थळी पोहचल्या व त्यांनी ग्रामस्थांनी पकडलेले १२ ट्रॅक्टर जप्त केले.