सट्टा, पत्ता, दारु बंदीसाठी महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 06:08 PM2019-12-10T18:08:00+5:302019-12-10T18:08:56+5:30
तक्रारी करुनही सट्टा, पत्ता, दारु का बंद होत नाही? असा संतप्त सवाल करत सुटकार, ता.चोपडा येथील शेकडो महिलांनी अडावद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या मांडला.
अडावद, ता.चोपडा, जि.जळगाव : तक्रारी करुनही सट्टा, पत्ता, दारु का बंद होत नाही? असा संतप्त सवाल करत सुटकार, ता.चोपडा येथील शेकडो महिलांनी अडावद पोलीस स्टेशनवर मोर्चा काढत ठिय्या मांडला. यावेळी सपोनी योगेश तांदळे यांनी महिलांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. अवैध धंदे त्वरित बंद होतील, असे ठोस आश्वासन मिळाल्याने महिला माघारी परतल्या. आंदोलनामुळे अडावद पोलीस स्टेशन गजबजले होते.
येथून जवळच असलेल्या सुटकार येथे सट्टा, पत्ता, दारू सर्रास सुरू असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून, कुटुंबे देशोधडीला लागत आहेत. अशा परिस्थितीत अवैध धंदे त्वरित बंद करावेत यासाठी पोलीस प्रशासनाने दखल घ्यावी या मागणीसाठी १० रोजी सकाळी ११ वाजता सुटकार येथील शेकडो महिलांनी मोर्चा काढत अडावद पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. शेकडो महिला, ग्रामस्थ, बालगोपाल आदींनी सुमारे तासभर ठिय्या आंदोलन केले. अवैध धंदे चालतातच कसे? यांच्यावर कोणाचा वरदहस्त? असे सवाल उपस्थित करीत महिलांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला.
अडावद पोलीस स्टेशनचे सपोनि योगेश तांदळे यांनी महिलांशी सविस्तर चर्चा करुन समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी महिलांनी आपापली गाºहाणी मांडली. अखेर सपोनि योगेश तांदळे यांनी ठोस कारवाई करणार असल्याचे आश्वस्त केल्याने महिलांना ठिय्या आंदोलन मागे घेतले.
मुजोर व्यावसायिकांना कुणाचे अभय?
सुटकार, वटारसह परिसरात सट्टा, पत्ता, दारू, जुगार यासह वाळूची मोठी तस्करी होत असल्याची नेहमीच ओरड होताना दिसूून येते. मग यांना कारवाईचा धाक का वाटत नाही? परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक गुन्हे शाखा विभाग, महसूल विभाग आदी विभागांकडूनही काही ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.
यावेळी सुटकारच्या सरपंच मंदाबाई कोळी, पूजा कोळी, रत्नाबाई कोळी, वर्षा कोळी, वैशाली कोळी, कल्पना ठाकरे, संगीता ठाकरे, दीपाली तायडे, मायाबाई कोळी, कोकिळाबाई कोळी, मीराबाई कोळी यासह पोलीस पाटील ज्ञानेश्वर सपकाळे, वासुदेव कोळी, जयराम ठाकरे, मुरलीधर ठाकरे, वासुदेव ठाकरे, दिनकर ठाकरे, साहेबराव ठाकरे, चंद्रकांत सोनवणे, महेंद्र सपकाळे, संदीप सपकाळे, पोउनि यादव भदाणे, पो.ना. कादीर शेख, फारुक तडवी आदींसह महिला तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
परिसरात अवैध धंद्यांच्या विरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल. पोलीस प्रशासनाचा कायमचा वचक रहावा यासाठी अवैध धंदेच नाही तर अवैध धंदेवायिकही हद्दपार करणार आहे. त्यासाठी अवैध धंदेचालकांचे रेकॉर्ड तपासले जात आहे. लवकर ठोस कारवाई हाती घेण्यात येईल.
-योगेश तांदळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन, अडावद, ता.चोपडा