दारूबंदीसाठी नागदुली येथील महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 10:34 PM2019-09-20T22:34:11+5:302019-09-20T22:34:18+5:30
पोलीस स्टेशन समोर ठिय्या : केल्या दारु भट्टया उध्वस्त
एरंडोल : तालुक्यातील गिरणा नदीच्या काठावरील नागदुली येथील महिलांनी व तरुणांनी २० सप्टेबर रोजी पंचक्रोशीतील गावठी दारूच्या भट्ट्या उध्वस्त करीत पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडल्याने पोलिसांनी त्यांना गावात दारुबंदीचे आश्वासन दिले आहे.
दारुबंदीसाठी रुद्रावतार घेतलेल्या या २०० महिलांनी दारुच्या भट्टया उध्वस्त करीत २०० लिटरचे ३५ ड्रम, नवसागर आणि गळलेली दारू तीन ट्रॅक्टर मध्ये भरून दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. सदर महिलांचा रुद्रावतार पाहून तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनच्या आवरात कामानिमित्त आलेले नागरिक आवक झाले. यावेळी महिलांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पोलीसांनी दारूबंदी करण्याबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे त्यांनी आंदोलन मागे घेतले.
नागदुली या गावात हात भट्टीची दारू बऱ्याच दिवसापासुन बोकाळली होती.गावात तळीरामांची संख्या वाढत होती. दारूपायी अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. व्यसनाधीन झालेल्या कुटुंबातील मुलामुलींची लग्न देखील जुळत नसल्याचे उपस्थित महिलांनी सांगितले. विशेष महत्वाची बाब म्हणजे नागदुली ग्रामपंचायतीवर मनीषा अहिरे या ग्रामसेविका कार्यरत असुन त्यांनी दारू बंदीसाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांना दारू विक्रेत्यांनी दमदाटी व धमक्या दिल्या, अशाही तक्रारी पुढे आल्या आहेत. या त्रासाला कंटाळुन व सहानशीलतेचा अंत झाल्यामुळे महिलांनी स्थानिक ग्रामपंचायतीकडे व एरंडोल पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले. विशेष हे की, नागदुली ग्रामपंचायतीने दारूबंदीचा ठराव २१ आॅगस्ट २०१९ रोजी झालेल्या ग्रामसभेत संमत केला आहे. पण तरी सुद्धा दारू व दारूड्ड्यांवर नियंत्रण झाले नव्हते. शेवटी त्रस्त व संतप्त महिलांनी २० सप्टेबर रोजी एरंडोल पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान रात्री उशिरा पर्यंत एरंडोल पोलीस स्टेशनाला गुन्हा दाखल केला असून ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
.. अन्यथा आमरण उपोषण
आश्वासनानुसार यापुढे दारूबंदी न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसू असा इशारा देण्यात आला आहे.