शिरसोली येथील वीर जवानाला भावपूर्ण निरोप
By Admin | Published: July 11, 2017 04:38 PM2017-07-11T16:38:52+5:302017-07-11T16:38:52+5:30
अंत्ययात्रेत सहभागी झाला हजारो नागरिकांचा जनसमुदाय
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.11 - वीर जवान मनोज माळी यांचे निधन झाल्यानंतर मंगळवारी त्यांच्यावर शिरसोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो महिला व पुरुषांनी अंत्यदर्शन घेत भावपूर्ण निरोप दिला.
शिरसोली येथील वीर जवान मनोज माळी यांचे आसाममध्ये दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. भारतीय सैन्यदलाचे दोन अधिकारी मृतदेह घेऊन शिरसोलीत दाखल झाले. मंगळवारी सकाळी 8 वाजता राहत्या घरी नातेवाईक व ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेतले. एका वाहनावर वीर जवान मनोज माळी यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. अशोक नगर, इंदिरा नगर, शिवराय चौक मार्गे अंत्ययात्रा स्मशानभूमीत दाखल झाली. याठिकाणी रितीरिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत वाजविण्यात आले. ‘वीर जवान मनोज अमर रहे’, भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणा देण्यात येत होत्या.
शाळा व व्यापारी प्रतिष्ठान ठेवले बंद
अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर गावातील व्यापारी प्रतिष्ठान नागरिकांनी स्वत:हून बंद ठेवले. पद्मालया इंग्लिश स्कूल, बारी समाज माध्यमिक विद्यालयात वीर जवान मनोज माळी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अंत्ययात्रेच्या मार्गावर देशभक्तीपर रांगोळी तसेच पुष्पवृष्टी करण्यात येत होती.
अधिकारी व लोकप्रतिनिधींची उपस्थिती
अंत्ययात्रेत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह अधिकारी व लोकप्रतिनिधींनी सहभागी होत अंत्यदर्शन घेतले. तसेच मनोज माळी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.