नाराजीचे पडसाद उमटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:04 AM2019-03-15T11:04:55+5:302019-03-15T11:06:16+5:30
धुळे तालुका
धुळे : गेल्या अनेक वर्षापासून शहरासह तालुक्यात कॉँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. परंतु गेल्यावेळी मोदी लाटेत शहरात प्रथमच भाजपाला संधी मिळाली. तर गेल्यावर्षी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळविले. पक्षाने मनपात सत्ता मिळविली तरी भाजपाला स्वपक्षाच्या आमदाराच्या टीकेचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉँग्रेस असा सामना होणार असला तरी, भाजपाला आपल्या पक्षाच्या आमदाराच्या नाराजीचा कितपत फटका बसतो, हे बघणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
धुळे लोकसभा मतदार संघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य व बागलाण या मतदार संघाचा समावेश होतो. लोकसभा निवडणुकीत धुळे शहर व तालुक्याची भूमिका ही निर्णायक ठरणारी आहे. लोकसंख्येचा विचार करता शहराचा वाटा हा मोठा असतो. शहरात महापालिकेचे ७४ प्रभाग आहेत. तर ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे १७ गट व ३४ गण आहेत.
कॉँग्रेसचेच वर्चस्व
धुळे तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला आहे. तालुक्यात शहर व कुसुंबा हे दोन विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात कुसुंबा मतदार संघातून कॉँग्रेसचे माजी मंत्री रोहीदास पाटील हे पाचवेळा निवडून आले आहेत. तर २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत कुसुंबा मतदार संघाऐवजी धुळे ग्रामीण मतदार संघ झाला. या मतदार संघातून पहिल्यांदा शिवसेनेचे प्रा. शरद पाटील हे २००९ मध्ये निवडून आले होते. मात्र पुढच्या निवडणुकीत त्यांना आपली जागा राखता आली नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत धुळे ग्रामीण मधून माजी मंत्री रोहीदास पाटील यांचे चिरंजीव कुणाल पाटील हे निवडून आले. धुळे मतदार संघातही कॉँग्रेसचे वर्चस्व होते. १९७८ ते १९९० पर्यंत कॉँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत. मात्र १९९५ मध्ये प्रथमच अपक्ष म्हणून राजवर्धन कदमबांडे निवडून आले होते. यानंतर धुळे मतदार संघात कधी राष्टÑवादी तर कधी लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत.बाजार समितीत काँग्रेसचे वर्चस्व असून, सभापतीपदी सुभाष देवरे आहेत. तर पंचायत समितीवर कॉँग्रेस -राष्टÑवादीची सत्ता असून, सभापतीपदी काँग्रेसच्या अनिता पाटील आहेत.
एकंदरीत धुळे तालुक्याचा विचार केल्यास कॉँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.याचा लोकसभा निवडणुकीत कितपत फायदा होतो, ते निवडणुकीनंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे.
मनपात भाजपाला प्रथमच संधी
२०१४ मध्ये भाजप-सेना, तसेच कॉँग्रेस- राष्टÑवादी कॉँग्रेस हे स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. परंतु मोदी लाटेत धुळे शहर मतदार संघातून अनिल गोटे हे भाजपतर्फे निवडून आले होते. त्यानंतर २०१८मध्ये झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाने ५० जागा जिंकून बहुमत मिळवित प्रथमच सत्ता स्थापन केली. धुळे शहर विधानसभा मतदार संघ व महापालिकेत भाजपाने प्रथमच सत्ता मिळविली आहे.
आता शहरातूनच आव्हान...
महानगरपालिका निवडणुकीपासून भारतीय जनता पक्षात दोन गट निर्माण झालेले आहेत. आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरूद्धच बंड पुकारलेले आहे. त्यामुळे भाजपाला खरे आव्हान हे स्वपक्षातूनच आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यातील ‘सख्ख’ सर्वश्रृत आहे. या सर्व गोष्टींचा विचार केल्यास शहरातून भाजपाला आघाडी मिळविणे कठीण जाऊ शकते असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.