पक्षांतर्गत समन्वय साधण्यावर राहणार भर - भाजप जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 12:21 PM2020-01-12T12:21:08+5:302020-01-12T12:22:32+5:30
भाजप जिल्हाध्यक्ष पदाचे स्वीकारले सूत्र
जळगाव : पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात जर काही नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असून पक्षांतर्गत समन्वय साधण्यावर भर राहणार असल्याचे भाजपचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी मावळते जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना वरील मनोदय व्यक्त केला.
वेळप्रसंगी कटू निर्णयही घेणार
पक्षात समन्वय साधण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक पातळीवर प्रयत्न करणार आहोत. कोणाच्या निवडीवरून अथवा इतर कोणत्याही कारणांवरून पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात नाराजी असेल तर सर्वांशी चर्चा करून प्रश्न सोडवू व ती नाराजी दूर करण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. वेळ प्रसंगी कटू निर्णय घ्यायची वेळ आली तर तसेही निर्णय घेण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला.
‘वसंत स्मृती’वर थांबणार
जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी थांबून पक्ष कार्यासाठी पूर्ण वेळ देणार असल्याचे सांगून यासाठी जळगाव येथे ‘वसंत स्मृती’ या भाजप जिल्हा कार्यालयाच्या ठिकाणी थांबणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रत्येक शहरातील नूतन कार्यकारिणी लवकरच
तालुकाध्यक्ष निवड झाल्या असून आता त्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नवीन कार्यकारीणीच्या निवडीसाठी सूचना देणार असून लवकरच नवीन कार्यकारीणींची निवड होईल, असे जावळे यांनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षांच्या भेटीसाठी मुंबईला
निवड झाल्यानंतर आता आपण प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी मुंबई येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे नूतन तालुकाध्यक्ष असे
जळगाव ग्रामीण - गोपाळ भंगाळे, चाळीसगाव शहर - घृष्णेश्वर पाटील, चाळीसगाव ग्रामीण - सुनील निकम, अमळनेर शहर - उमेश वाल्हे, अमळनेर ग्रामीण - हिरालाल पाटील, पाचोरा शहर - रमेश वाणी, पाचोरा ग्रामीण - अमोल शिंदे, पारोळा - अतुल मोरे, भडगाव - अमोल पाटील, एरंडोल - मच्छिंद्र पाटील, यावल - उमेश फेगडे, रावेर - राजन लासूरकर, भुसावळ शहर - दिनेश नेमाडे, भुसावळ ग्रामीण - भालचंद्र पाटील, मुक्ताईनगर - रामभाऊ पाटील, बोदवड - विनोद कोळी, जामनेर - चंद्रकांत बाविस्कर, चोपडा शहर - गजेंद्र जैस्वाल, चोपडा ग्रामीण - पंकज पाटील.