मानव व वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यावर भर - उप वनसंरक्षक विवेक होशिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 01:26 PM2020-08-30T13:26:20+5:302020-08-30T13:26:44+5:30
वाघाचाही संचार वाढण्याचा विश्वास
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जंगलामध्ये वाढता मानवी हस्तक्षेप तसेच बिबटया असो अथवा इतर हिंस्त्र प्राणी यांचा मानवी वस्त्यांकडे वाढलेला संचार रोखून मानव व वन्यजीवांचा संघर्ष टाळण्यावर आपला भर राहणार असल्याची माहिती नवनियुक्त उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी दिली.
जळगावचे उप वनसंरक्षक म्हणून होशिंग यांनी नुकताच पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता त्यांनी वरील मनोदय व्यक्त केला. या वेळी त्यांच्याशी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात झालेला संवाद....
प्रश्न - मेळघाट ते वढोदा कॉरिडॉर प्रस्तावाची काय स्थिती आहे?
उत्तर - वढोदा वनक्षेत्र ‘कॉन्झर्व्हेशन रिझर्व्ह’ म्हणून घोषित झालेले आहे. त्यानुसार त्या ठिकाणी विविध उपाययोजना केल्या जाणार असून त्याचा प्लॅनही पाठविण्यात आला असून चार कोटी रुपयांचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाचाही प्रस्ताव पाठविला असून मेळघाट ते वढोदा कॉरिडॉरमुळे वाघांचा संचार वाढण्यास मदत होईल.
प्रश्न - वनोत्सवावर कोरोनाचा परिणाम जाणवत आहे का ?
उत्तर - हो नक्कीच. वन विभाग व सामाजिक वनीकरणकडून वृक्षांची लागवड केली जात आहे. मात्र रोपे उपलब्ध असले तरी नागरिक पुढे येत नाही. अजूनही त्यांच्या मनामध्ये भीती आहे. या बाबत दक्षता घेतलीच पाहिजे. मात्र सुरक्षितता बाळगत वृक्ष लागवडीसाठीही पुढे यावे.
प्रश्न - जळगावातील लांडोरखोरी वनोद्यानात पासधारकांना परवानगी देण्यात येईल का?
उत्तर - सध्या कोरोनामुळे जे निर्बंध आहे, त्यानुसार काम केले जाईल. सध्या फिरण्यासंदर्भात निर्बंध आहेत.
गणेशोत्सवाच्या काळातच वनोत्सवाही सुरू आहे. या दोघांची सांगड घालत पर्यावरण रक्षणासाठी सर्वांना पुढाकार आवश्यक आहे. यासाठी गणेशोत्सवातील निर्माल्यांच योग्य विल्हेवाट लावणे, पाण्याचे स्त्रोत दुषित होण्यापासून वाचविणे असे प्रयत्न झाल्यास वृक्षांनाही लाभ होईल. तसेच वृक्ष लागवडीसाठी ग्रामपंचायत, नगरपालिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उप वनसंरक्षक विवेक होशिंग यांनी केले आहे.
प्रस्ताव पाठविला
वढोदा ता. मुक्ताईनगर ते मेळघाट या दरम्यान व्याघ्र संचार प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.