विमानतळावरील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:46 AM2021-02-20T04:46:12+5:302021-02-20T04:46:12+5:30
जळगाव : जळगाव विमानतळावरील तांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, खबरदारी म्हणून विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांची ...
जळगाव : जळगाव विमानतळावरील तांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, खबरदारी म्हणून विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांची शुक्रवारी जिल्हा आरोग्य विभागाने कोरोनाच्या चाचण्या केल्या. चाचणी केलेल्या कर्मचाऱ्यांचा अहवाल दोन दिवसांनी येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. विमानाने बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची थर्मल स्किनिंग करण्यात येत आहे. चार दिवसांपासून दोन कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची जिल्हा रुग्णालयातर्फे कोरोना चाचणी करण्यात आली होती. शुक्रवारी एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
इन्फो :
खबरदारी म्हणून इतर कर्मचाऱ्यांचीही चाचणी
विमानतळ प्रशासनाने शुक्रवारी विमानतळावरील अन्य कर्मचाऱ्यांच्याही जिल्हा आरोग्य विभागामार्फत कोरोना चाचण्या केल्या. जिल्हा आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री सोनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. परमानंद पाटील, आरोग्य सेवक पकंज तायडे, संतोष पावरा आदी कर्मचाऱ्यांनी विमानतळावर जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी केली. या कर्मचाऱ्यांचा अहवाल आता दोन दिवसांनी प्राप्त होणार आहे.