"ब्रेक द चेन"मध्ये ८००० मजुरांना "रोजगाराची हमी"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:16 AM2021-04-20T04:16:30+5:302021-04-20T04:16:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या संकटात अनेक व्यवहार ठप्प झाल्याने बहुतांश जणांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत रोजगार ...

"Employment Guarantee" for 8000 workers in "Break the Chain" | "ब्रेक द चेन"मध्ये ८००० मजुरांना "रोजगाराची हमी"

"ब्रेक द चेन"मध्ये ८००० मजुरांना "रोजगाराची हमी"

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या संकटात अनेक व्यवहार ठप्प झाल्याने बहुतांश जणांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या मजुरांची संख्या वाढत असून या ठिकाणी सुरू असलेल्या कामामुळे त्यांना आधार मिळत आहे. जिल्ह्यातील सात हजार ९०० मजुरांच्या हाताला काम मिळवून त्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध झाला आहे. विशेष म्हणजे शनिवारच्या तुलनेत सोमवारी मजुरांची संख्या एक हजार २०० ने वाढली असून मागेल त्याला काम निर्बंध काळात मिळत आहे.

कोरोनाचा संसर्ग उद्भवल्यानंतर ब्रेक द चेनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद आहे. त्यामुळे घर कसे चालवावे असे संकट सर्वांसमोर उभे आहे. यात ग्रामीण भागात तर शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही. मात्र सध्या शेतीमध्ये देखील जास्त कामे नसल्याने अनेकांकडे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. यात अनेक मजुरांनी रोजगार हमी योजनेकडे धाव घेतली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी कोरोनाचे संकट ओढवले तेव्हापासून रोजगार हमी योजनेच्या कामावर मजुरांची संख्या वाढतच आहे. यात गेल्या वर्षभरातील प्रत्येक महिन्याची सरासरी पाहिली असता किमान आठ हजार मजूर तरी जिल्हाभरात वेगवेगळ्या कामाच्या ठिकाणी होते. विशेष म्हणजे मे २०२० मध्ये कडक लॉकडाऊनच्या काळात मजुरांची संख्या नऊ हजार ५००च्या पुढे गेली होती.

दोन दिवसांत वाढले १२०० मजूर

दोन आठवड्यांपूर्वी ब्रेक द चेन लागू केल्यानंतर हळूहळू सर्वांपुढे रोजीरोटीचा प्रश्न दररोज उभा राहत आहे. यात मोलमजुरी करणाऱ्यांचे तर जास्तच हाल होत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाकडे मजुरांची नोंदणी वाढू लागली आहे. यामध्ये १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात सहा हजार ७०० मजुरांची नोंद होती. त्यानंतर दोनच दिवसात पुन्हा मजुरांनी मागणी केल्याने जिल्ह्यातील मजुरांची संख्या सात हजार ९००वर पोचली आहे. या सर्व मजुरांना काम देण्यात आले आहे.

जिल्ह्यात ९८५ कामे सुरू

जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये एकूण ९८५ कामे सुरु असून काम दिलेल्या ७९०० पैकी सहा हजार ७९ मजूर १९ एप्रिल रोजी कामावर हजर होते. रोजगार हमी योजनेअंतर्गत सध्या गुरांचा गोठा शेड उभारणे, जिल्हा परिषदेच्या शाळांना कुंपन भिंतीचे काम, विहिरींचे काम, शेतीच्या बांधावर वृक्ष लागवड, शोष खड्डे असे काम सुरू आहे.

गेल्या वर्षी व यावर्षी निर्बंध काळातील मजुरांची संख्या

३१ जुलै २०२० - ८४७१

३१ मार्च २०२१ - ७१२२

१९ एप्रिल २०२१- ७९००

तालुकानिहाय कामावर असलेल्या मजुरांची संख्या (१९ एप्रिल)

तालुका - मजूर संख्या

अमळनेर - १२६

भडगाव ४१

भुसावळ २९०

बोदवड ५८८

चाळीसगाव ८८१

चोपडा ७३८

धरणगाव ३३२

एरंडोल ६०३

जळगाव १७०

जामनेर ४२२

मुक्ताईनगर ५

पाचोरा ३१८

पारोळा ७५५

रावेर ४५३

यावल ३५७

एकूण ६०७९

Web Title: "Employment Guarantee" for 8000 workers in "Break the Chain"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.