अमळनेरातील पं.स. सभापती बंगल्याचा सार्वजनिक मुतारी म्हणून वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 07:41 PM2018-01-14T19:41:05+5:302018-01-14T19:48:55+5:30
२००५ साली तत्कालीन सभापतींच्या आत्महत्येमुळे भूतबंगला म्हणून कुप्रसिद्धी पावलेल्या हा बंगला तेव्हापासून रिकामा पडला असून किमान पं.स.सदस्यांना तरी त्याचा वापर करू देण्याची मागणी आता होत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.१४ : पंचायत समितीच्या सभापती बंगल्याचा वापर सद्यस्थितीत सभापती करत नसल्याने तो बंगला सार्वजनिक मुतारी म्हणून वापरला जात आहे, त्यामुळे पंचायत समिती सदस्यांना तरी या बंगल्याचा वापर करू द्यावा अशी मागणी सदस्य विनोद पाटील यांनी केली आहे.
आॅक्टोबर २००५ मध्ये तत्कालीन सभापती विवेक पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. तेव्हापासून हा बंगला भूतबंगला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गेल्या १२ वर्षांपासून एकही सभापती येथे राहायला आलेला नाही. अंधश्रद्धेपोटी हा बंगला रिकामा पडला असल्याने त्याचा वापर सार्वजनिक मुतारी म्हणून होत आहे. अनेकवेळा याबाबत तक्रारी होऊनही पं. स. चे अभियंते याकडे दुर्लक्ष करीत आहेत. धुळे रस्त्यावरील बसस्थानकाशेजारील ही वास्तू असून आज त्याची दूरवस्था झाली आहे . अनेक वेळा त्याचा सिगारेट कट्टा , तसेच गैरप्रकारासाठीही उपयोग होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. दरम्यान, सभापती जर हा बंगला वापरत नसतील तर किमान पंचायत समिती सदस्यांना तरी वापरायला तो द्यावा अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे. तर यापूर्वी उपसभापती त्रिवेणाबाई पाटील यांनीही उपसभापतींना तरी निवासासाठी द्यावा अशी मागणी केली होती.
काही महिन्यांपूर्वी बंगला दुरुस्तीचे अंदाजपत्रक जिल्हा परिषदेला मंजुरीसाठी पाठवण्यात आले होते, मात्र सभापतींनी नकार दिल्याने तो प्रस्ताव तसाच पडला आहे. लोकप्रतिनिधीच जर अंधश्रद्धाळू असतील तर ग्रामीण जनतेला न्याय मिळू शकेल काय असाही सूर उमटत आहे.