अतिक्रमण निर्मूलन पथकाने केले सहा दुकाने सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:16 AM2021-04-04T04:16:43+5:302021-04-04T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी राबविलेल्या जोरदार मोहिमेत विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. या मोहिमेत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाने शनिवारी राबविलेल्या जोरदार मोहिमेत विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली. या मोहिमेत बाजारपेठेतील विविध मार्केट मधील विक्रेत्यांकडील सहा ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला आला असून, विना मास्क प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तीन चालकांच्या रिक्षाही जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कारवाईमुळे फुले मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागी व्यवसाय करण्याची सूचना केली असतानाही, हे विक्रेते मनपाचे आदेश न पाळता कोरोना काळातही बाजारपेठेत दुकाने थाटून व्यवसाय करीत आहेत. परिणामी बाजार पेठेत दररोज मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून, सोशल डिस्टनिंगचे कुठलेही पालन होत नसल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे शनिवारी बाजाराच्याच दिवशी उपायुक्त संतोष वाहुळे यांनी जोरदार कारवाई मोहीम राबविली. सकाळ पासूनच अतिक्रमण विभागाचे पथक फुले मार्केट मध्ये आले. स्वतः संतोष वाहुळे यांनी येथील विक्रेत्यांना नेमून दिलेल्या जागी व्यवसाय करा, अन्यथा मनपाच्या कारवाई आधी दुकाने उचलण्याचे आवाहन केले. फुले मार्केट, चौबे मार्केट, घाणेकर चौक, सुभाष चौक, दाणा बाजार परिसर येथील सर्व विक्रेत्यांना दुकाने उचलण्याचे आवाहन केले. मात्र, तरीदेखील बहुतांश विक्रेत्यांनी दुकाने जैसे थे ठेवली होती.
इन्फो :
अन् मनपाने राबविली जोरदार मोहीम
सूचना करूनही विक्रेते साहित्य उचलत नसल्याने उपायुक्त संतोष वाहुळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांच्याकडे पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. मुंडे यांनी तात्काळ आरसीपीच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी दिल्या. त्यानंतर अतिक्रमण विभागाने फुले मार्केट, चौबे मार्केट, घाणेकर चौक, सुभाष चौक, दाणा बाजार परिसर या ठिकाणी जोरदार कारवाई मोहीम राबविली. यात भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, कपडे विक्रेते आदी किरकोळ व्यावसायिकांचा दिवसभरात सहा ट्रॅक्टर मला जप्त करण्यात आला. फुले मार्केट मध्ये तर मनपाच्या इलेक्ट्रॉनिक रूम मधून व्यवसायिकांनी ठेवलेला दोन ट्रॅक्टर माल जप्त करण्यात आला.
इन्फो :
विक्रेत्यांचा विरोध, हुज्जत आणि तणाव
मनपाने पोलिस बंदोबस्तात राबविलेल्या जोरदार कारवाईमुळे अनेक विक्रेत्यांनी एकत्र येऊन या कारवाईला विरोध केला तर काहींनी उपायुक्तांसोबत हुज्जत घातली. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांमुळे काही वेळातच वातावरण निवळले. सायंकाळी सात पर्यंत ही कारवाई करण्यात आली.
इन्फो :
दुकानात सोशल डिस्टनिंगचा फज्जा, सहा दुकाने सील
मनपाची ही कारवाई सुरू असताना उपयुक्तांना दाणा बाजार, फुले मार्केट व गांधी मार्केट मध्ये कपडे व धान्य दुकानांमध्ये सोशल डिस्टनिंगचे कुठलेही पालन न होता, ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून आली. त्यामुळे विजय किराणा, स्वामी बेसन कंपनी, सोनसखी ज्वेलरी या सह इतर तीन दुकान दारांची दुकाने सील करण्यात आली. या दुकानदारांवर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्तांनी सांगितले. तसेच मनपा इमारती समोरून बस स्थानकाकडे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या तीन रिक्षा चालक विना मास्क रिक्षा चालवीत होते.यावेळी त्यांच्याही रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच फुले मार्केट मध्ये नागरिकांना चालण्यासाठी अडथळा होईल, अशा ठिकाणी दुचाकी पार्किंग केलेली दुचाकीहीं यावेळी जप्त करण्यात आली.