सपाटीकरणावर पुन्हा अतिक्रमण
By admin | Published: January 4, 2017 12:41 AM2017-01-04T00:41:54+5:302017-01-04T00:41:54+5:30
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले.
जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही न झाल्याने अतिक्रमणधारकांची सोय झाली आहे. काही दिवसात आचारसंहिता लागणार असल्याने वेळेत कार्यवाही न झाल्यास कामात दिरंगाई होण्याची शक्यता आहे.
सिमांकनाचे काम रखडले
राष्ट्रीय महामार्गालगत असलेले अतिक्रमण काढण्यासाठी तालुका भूमीअभिलेख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका यांचे संयुक्त पथक नियुक्त करून सिमांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले होते. मात्र या मार्गाच्या भूसंपादनाचे अभिलेख मिळत नसल्याने सिमांकनाचे काम रखडले आहे.
सपाटीकरणामुळे अतिक्रमण वाढले
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यावर बांधकाम मटेरियल तसेच वाढीव झाडे व झुडपे असल्याने महापालिकेने सामाजिक संस्था तसेच उद्योजकांना आवाहन केले होते. त्यानुसार जैन उद्योग समुहाने जेसीबी व डंपरच्या साहाय्याने शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय, आय.टी.आय या भागातील समांतर रस्त्याचे सपाटीकरण केले.
मात्र महापालिकेने सपाटीकरणानंतर कोणतीही कार्यवाही न केल्याने या रस्त्यावर खुर्च्या, सोफा, मटके तसेच साहित्य विक्री करणाºया नागरिकांनी अतिक्रमण करीत नव्याने दुकाने थाटली आहेत.
काटेरी झुडपे काढण्याची गरज
महामार्गालगत असलेल्या समांतर रस्त्यावर सपाटीकरण केल्यानंतर दोन्ही बाजूला असलेल्या वाढीव काटेरी झुडपे तसेच नाल्याचा प्रवाह सुरळीत करण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने आपल्या सफाई कर्मचाºयांच्या मदतीने ही मोहिम राबविणे आवश्यक आहे. बांभोरी पुलापासून ते खोटेनगरपर्यंत बहुतांश काटेरी झुडपे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. याकडे नेहमी दुर्लक्षच होत असते.
संघटनांच्या सहभागाची आवश्यकता
महापालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जैन उद्योग समुहाने समांतर रस्त्यांच्या सपाटीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते खोटेनगरपर्यंत दोन्ही बाजूला पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा सार्वधिक धोका असतो. औद्योगिक वसाहत भागातील उद्योजक तसेच शहरातील सामाजिक व सेवाभावी संघटनांनी पुढे येऊन या समस्या दूर करण्याचीच आवश्यकता असल्याच्या अपेक्षा आता शहरातील नागरिकांकडून केल्या जात असून यामुळे मोठी समस्या दूर होणार असल्याचे बोलले जात आहे.